तज्ज्ञ नसल्याने वरोरातील सोनोग्राफी मशीन धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:01:20+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा शहर, माढेळी, कोसरसार, नागरी, सावरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा तालुक्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यात या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळंतपणेही करण्यात आल्याने रुग्णालयाला शासनाने पुरस्कारही घोषित केला आहे.

The sonography machine in Warora was washed away due to lack of expertise | तज्ज्ञ नसल्याने वरोरातील सोनोग्राफी मशीन धुळखात

तज्ज्ञ नसल्याने वरोरातील सोनोग्राफी मशीन धुळखात

ठळक मुद्देवरोरा उपजिल्हा रुग्णालय : गर्भवतींना जावे लागते चंद्रपूरला

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र मागील पाच महिन्यांपासून तज्ज्ञाशिवाय धूळखात पडले आहे. त्यामुळे रुग्णांसह गर्भवतींना सोनोग्राफी करण्याकरिता चंद्रपूर येथे जावे लागते. यामध्ये शारीरिक तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा शहर, माढेळी, कोसरसार, नागरी, सावरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा तालुक्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यात या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळंतपणेही करण्यात आल्याने रुग्णालयाला शासनाने पुरस्कारही घोषित केला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येथील सोनोग्राफी यंत्र सुस्थीत होते. परंतु जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सोनोग्राफी तज्ज्ञ आले नसल्याने एकही सोनोग्राफी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी चंद्रपूरला जावे लागत आहे. यामध्ये वेळ व पैसाही खर्च होत आहे. यातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असल्याने स्वत:च्या वाहनाने चंद्रपूर येथे जाणे त्यांना अवघड होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीसुद्धा बंद आहे. त्यातच काही ठिकाणी एसटी सुुरु आहे. मात्र एसटीने जाण्यावरही निर्बंध घालण्यात आल्याने त्यांना फार मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोनोग्राफी तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अतुल वानखेडे यांनी वैद्यकीय अधिक्षकांनाना निवेदनही दिले आहे. मात्र अद्यापतरी यावर तोडगा निघाला नाही.

सोनोग्राफी तज्ज्ञावर कोरोनाचे सावट
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी तज्ज्ञ नागपूर येथून येत होते. मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी सुरू झाल्याने तज्ज्ञाचे येणे बंद झाले. वरोरा येथे आल्यास क्वारंटाईन व्हावे लागेल या भीतीने ते येत नसल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी सोनोग्राफी यंत्र धूळखात आहे.

पूर्वी असलेले तज्ज्ञ सद्या येवू शकत नाही. परिसरातील तज्ज्ञांशी बोलणे सुरू आहे. परंतु आजतागत सोनोग्राफी यंत्र तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली नाही.
- डॉ. जी.एल. दुधे, अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय, वरोरा

Web Title: The sonography machine in Warora was washed away due to lack of expertise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.