‘सोनी’च्या तेजाने उजळली चंद्रमौळी झोपडी

By Admin | Updated: June 11, 2015 01:24 IST2015-06-11T01:24:22+5:302015-06-11T01:24:22+5:30

घरातील हलाकीच्या परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास करून चंद्रमौळी झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणणाऱ्या सोनी भाऊराव सातरे या विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत ९२.२० टक्के ...

'Soni' shines bright Chandramouli hut | ‘सोनी’च्या तेजाने उजळली चंद्रमौळी झोपडी

‘सोनी’च्या तेजाने उजळली चंद्रमौळी झोपडी

सावली : घरातील हलाकीच्या परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास करून चंद्रमौळी झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणणाऱ्या सोनी भाऊराव सातरे या विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत ९२.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. आई वडिलांचा शिक्षणासोबत दुरान्वयानेही संबंध नसताना सोनीने दहावीच्या परीक्षेत घेतलेली भरारी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. वडील भाऊराव हे हमाली करुन तर आई ललिता मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांना सोनी व मोनी या दोनच मुली. त्यांच्या भवितव्यासाठी पारंपारिक मच्छीमारीचा व्यवसायही ते करीत आहेत. अशाही परिस्थितीत सोनीने मिळविलेले यश तालुक्यासाठी भूषणावहच आहे. कोणत्याही प्रकारची शिकवणी अथवा मार्गदर्शन न घेता केवळ वर्गात शिकविलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर दररोज सायंकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत घरीच अभ्यास करून तिने यश संपादन केले आहे. विश्वशांती विद्यालय सावली येथे शिक्षण घेऊन तिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला असला तरी विद्यालयाचे एकही शिक्षक सोनीच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी गेले नव्हते. घरातील अडचणीची परिस्थिती बघता सोनीलासुद्धा मजुरीच्या कामावर जावे लागत होते. अशाही बिकट परिस्थितीत तिने ९२.२० टक्के गुण घेऊन आई वडिलांसोबतच तालुक्याचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Web Title: 'Soni' shines bright Chandramouli hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.