गावचा मुलगा मुख्यमंत्री झाला !

By Admin | Updated: October 29, 2014 22:46 IST2014-10-29T22:46:41+5:302014-10-29T22:46:41+5:30

राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल हे गाव म्हणजे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आरुढ होणारे या गावातील ते दुसरे मुख्यमंत्री असतील.

The son of the village has become the chief minister! | गावचा मुलगा मुख्यमंत्री झाला !

गावचा मुलगा मुख्यमंत्री झाला !

मूलमध्ये आनंदोत्सव : गावात अपूर्वाईचा जल्लोष
राजू गेडाम - मूल
राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल हे गाव म्हणजे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आरुढ होणारे या गावातील ते दुसरे मुख्यमंत्री असतील. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांचे मारोडा या गावाशी घट्ट नाते होते. तशीच घट्ट नात्याची विण मूल या गावाशी नव्या मुख्यमंत्र्यांची आहे. मूलशी केवळ त्यांचे कौटुंबिक नातेच नाही तर, या शहरात त्यांनी आपले बालपण घालविले आहे. म्हणूनच त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड होणार हे कळल्यापासून या शहराला आनंदाचे भरते आले आहे. कौतुकासोबतच त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.
अमृतराव फडणवीस हे देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा ! ते मालगुजार होते. सन १९२७ ला त्यांनी मूल येथे ‘वाडा’ बांधला त्याला ‘फडणवीस वाडा’ म्हणून ओळखले जाते. याच वाड्यात आजोबा काशिराव फडणवीस यांची आठ अपत्ये बागडली. नरहरी फडणवीस, माधवराव फडणवीस, गंगाधर फडणविस, बाळासाहेब फडणवीस, बाबा फडणवीस तर बहिणी सुशीला, विमल, प्रेमिला अशी ही भावंड. माधवराव फडणवीस हे आमदार शोभाताई फडणवीस यांचे पती होते. युतीच्या काळात त्या कॅबिनेट मंत्री होत्या. सध्या त्या विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे सुद्धा विधानपरिषदेचे सदस्य होते.
देवेंद्र यांचे बालपण मूल येथे गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूलमध्येच झाल्याचे त्यांचे बालमित्र सांगतात. पुढे शिक्षणासाठी सन १९६५ दरम्यान ते नागपूरला स्थायिक झाले. बालपणापासून वाड्यात होणाऱ्या जनसंघाच्या बैठकांमधून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. नागपूरला स्थायिक झाल्यावरही त्यांचा मूलशी कायम संपर्क राहिला.
नागपूरचे महापौर असताना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांची मूलची वारी कधी चुकली नाही. आता मुख्यमंत्री झाल्यावर ते कधी येतात, याकडे मूलवासीयांचे लक्ष लागले आहे.
कौतूक अन् अपेक्षांची बरसात !
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आरुढ होत असल्याने मूलवासीयांमध्ये आनंद पसरला आहे. त्यांच्या कुटुंबाशी जुळून असलेले अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेतच, सोबतच तालुक्यातून नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.
येथील व्यावसायिक मोती टहलियानी म्हणाले, गावाशी नाळ जुळली असणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरुढ होत असल्याने अत्यानंद होत आहे. मूल येथे त्यांची आजही शेती आहे. ते शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना येथील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत आहेत. या भागात शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था ते उभारतील, असा विश्वास आहे.
राजोलीतील भाजपाचे ८१ वर्षीय वयोवृद्ध कार्यकर्ते शामराव पेशेट्टीवार म्हणाले, जनसंघापासून देवेंद्र भाजपाशी जुळले आहेत. आपल्या भागातील मुख्यमंत्री होत असल्याने तालुक्यातील समस्या विशेष प्राधान्याने सोडवतील अशी त्यांना अपेक्षा आहे.
राजोलीतील भाजपाचे कार्यकर्ते असलेले ८३ वर्षीय आनंदराव शेंडे यांनीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असल्याने तालुक्याच्या विकासाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांचे बालमित्र रवींद्र बोकारे म्हणाले, देवेंद्रला क्रिकेटचे जास्त आकर्षण आहे. मूलमध्ये आल्यावर सर्व मित्र जमून आम्ही वाड्यात क्रिकेट खेळत असू. या मातीशी देवेंद्रची नाळ जुळली असल्याने या भागाचा विकास होईल.
मूल पंचायत समितीचे उपसभापती गजानन वल्केवार म्हणाले, ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या पंचायत समितीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या पायगुणाने विविध योजनांची अमंलबजावणी समक्षपणे होईल असा विश्वास आहे.
मूल भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप म्हणाले, युवा मुख्यमंत्री मिळाल्याने युवकांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. विशेषत: तालुक्यातील बेरोजगारांना न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील. मारोडा येथील प्रवीण तोटावार यांनीही बेरोजगारीचा प्रश्न नवे मुख्यमंत्री सोडवितील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मूल शहरात लहानपणापासून वाढलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आरुढ होत आहेत. आमच्या शहराबद्दल आम्हाला अभिमान आहे. मूल शहर, सुंदर शहर अशी संकल्पना राबवून ते विकासाला हातभार लावतील, अशी अपेक्षा संजय चिंतावार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The son of the village has become the chief minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.