‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहात
By Admin | Updated: December 6, 2014 22:46 IST2014-12-06T22:46:29+5:302014-12-06T22:46:29+5:30
शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या

‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहात
सृजनचे आयोजन : शेरो-शायरीची उधळण करीत रंगला कार्यक्रम
चंद्रपूर : शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या विरमलवार हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रामायण-महाभारतातील दाखले देत, शेरो शायरीची उधळण करीत व्यासांनी अनेक किस्से सांगत लोकांच्या दुटप्पी मानसिकतेवर बोट ठेवले. कोणी काहीही म्हटले तरी सद्सद्विवेक बुध्दीचा कौल प्रमाण मानत आयुष्यात वाटचाल सुरू ठेवावी, असे सांगत व्यासांनी नवोदिता संस्थेच्या प्रारंभिक दिवसाबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांना आलेले कटू अनुभवही कथन केले.
लोक काही ना काही बोलणारच असतात. ‘हाथी चलता है कुत्ते भोंकते है’ या सर्वपरिचित वाक्याचा मथितार्थ त्यांनी यावेळी उलगडवून दाखवला. जग ‘हायवे’ ने जाणारे असते. त्यामुळे ‘मायवे’ ने जाणाऱ्यांना उपेक्षीची वागणूक मिळत असते, असे सांगत संध्या विरमलवारांनी शेवटी ‘मायवे’ ने जाणारेच काहीतरी चारचौघांपेक्षा आगळेवेगळे करून जात असतात, असे सांगितले. मानसशास्त्राचे विविध कंगोरे उलगडवून दाखवित त्यांनी टिका ही अभ्यासपूर्ण असते आणि निंदा ही उथळ आणि बिनबुडाची असते असे सांगत काहीही केले तरी दूषणे देण्याची प्रवृत्ती प्राचीन असल्याचेही सांगितले.
चुगली करण्याची प्रवृत्ती अत्यंत घातक असल्याचे सांगत त्यांनी निसर्गाचे आदर्श उदाहरण देत कोणाची उणीदुणी काढणे थांबायला हवे असेही सांगितले. विलास घडसे यांनी यावेळी, कुछ तो लोग कहेंगे हे अमरप्रेममधील किशोरकुमारने गायिलेले गीत गावून वातावरण निर्मिती केली.
छबू वैरागडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. या कार्यक्रमात लोकांच्या विकृत मानसिकतेचे अनेक पैलू उलगडण्यात आलेत. (प्रतिनिधी)