घनकचरा प्रकल्प जागेच्या वादात अडकला
By Admin | Updated: July 5, 2014 01:19 IST2014-07-05T01:19:02+5:302014-07-05T01:19:02+5:30
घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत..

घनकचरा प्रकल्प जागेच्या वादात अडकला
चंद्रपूर: घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत नसल्याचे दिसते. नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला या प्रकल्प निर्मितीचे कंत्राट दिले आहे. कंत्राट देताना प्रारंभी सात एकर जागा रिकामी व साफ करून देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र सदर जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे कारण पुढे करून या कंपनीने काम सुरू केले नाही तर महापालिका जागा साफ करून दिल्याचेच सांगत आहे. जागेच्या या वादात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र अडला आहे.
विशेष म्हणजे, प्रकल्पच सुरू होऊ न शकल्यामुळे सुमारे पाच लाख टन कचरा डम्पींग यार्डवर पडून आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. केव्हाही पाऊस येण्याची शक्यता आहे. या कचऱ्यामुळे पावसाळ्यात जलप्रदूषणाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातून दररोज १३० ते १४० टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडत असतानाही चंद्रपुरात आजवर घनकचरा प्रकल्प उभा होऊ शकला नाही. याशिवाय घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही चंद्रपूर दुर्देवीच ठरले. चंद्रपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना घनकचरा व्यवस्थापनाचे धिंडवडेच उडाले होते. त्यानंतर आता मागील वर्षी नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. ३१ मे २०१३ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव क्रमांक ४२ नुसार २३० रुपये प्रति टन या हिशेबाने घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले.
४ जून २०१३ रोजी वर्क आर्डरही देण्यात आला. यावेळी कारखाना उभारणीसाठी किमान सात एकर जागा कंत्राटी कंपनीला उपलब्ध करून देण्याचा करार झाला होता. ही जागा साफ करून त्याचे सपाटीकरणही करण्यात येणार होते. यातील तीन एकर जागा साफ करून दिल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात मनपाने ही जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि.चे संचालक विजय भांडारवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत त्यांनी अनेकदा महापालिकेकडे पत्र पाठवून लक्ष वेधले. मात्र मनपाने त्यांच्या पत्रव्यवहाराकडे लक्षच दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्यासाठी अनेक मशनरीज कन्यका कंपनीने दिल्लीतून तयार करवून घेतल्या आहेत. यात सदर कंपनीने कोट्यवधी रुपये लावले आहे. या सर्व मशनरीज चंद्रपूरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केव्हाही तयार आहेत, असेही भांडारवार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, जागेच्या या वादात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मात्र अडून पडला आहे. आतापर्यंत कारखान्याचे काम सुरू होणे अपेक्षित असताना एक वर्षानंतर कामाचा शुभारंभही झालेला नाही. (शहर प्रतिनिधी)