वन्य प्राण्यांना पाण्यासाठी जंगलात सौरपंप
By Admin | Updated: March 6, 2015 01:13 IST2015-03-06T01:13:56+5:302015-03-06T01:13:56+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असून उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकावे लागते.

वन्य प्राण्यांना पाण्यासाठी जंगलात सौरपंप
मूल : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असून उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकावे लागते. जंगलात असलेले पाणवठे यावर्षी कमी पाऊस पडल्याने जानेवारी महिन्यातच आटले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी हातपंप आहे, त्या जंगलव्याप्त परिसरात सूर्याच्या किरणांवर चालणारे सौरपंप लावण्यासाठी वनविभाग पुढाकार घेणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांना पाणी मिळावे यासाठी ५४ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यात नैसर्गिक व कृत्री पाणवठ्याचा समावेश आहे. यात चार माही, आठ माही व बारमाही स्वरूपात पाणवटे असून सध्या २४ पाणवठे नैसर्गिक स्वरूपाचे आहेत. त्यात काही प्रमाणात पाणी साठून आहे. मात्र १०९३१.६१ हेक्टर आर बफर झोन परिक्षेत्राचे क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी पाणवठ्याजवळ पाणी पिण्यासाठी नक्कीच येत असतात. हे हेरुन काही शिकारी पाणवठ्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे बोलल्या जात आहे. होळी व धुलीवंदनाच्या पर्वावर पाणवठ्यावर शिकारीची शक्यता वनविभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
येथे लागणार सौरपंप
जंगलव्याप्त असलेल्या भागात चार हातपंप आहेत. त्या ठिकाणी सौरपंप लावण्यात येणार आहेत. यात डोनी, करवन, फुलझरी व जानाळा या परिसरातील ठिकाणाचा समावेश आहे. या ठिकाणी सौरपंप लावल्यास दिवसभर जवळच्या नाल्याजवळ पाणी साचून राहात असल्याने वन्यप्राण्यांना सोयीचे होऊ शकते.
होळी व धुलीवंदनाच्या दिवशी शिकार टाळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यालयी राहून कर्तव्य बजावण्याबाबत कळविण्यात आले असून हयगय झाल्या कारवाई करण्यात येईल.
- ओमप्रकाश पेंदोर, वनपरिक्षेत्र अधिकारी मूल