वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागाचे सोलर कुंपण
By Admin | Updated: October 8, 2014 23:23 IST2014-10-08T23:23:14+5:302014-10-08T23:23:14+5:30
वनालगतच्या शेतात जावून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातून वन्यप्राणी व मानवात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी

वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागाचे सोलर कुंपण
वरोरा : वनालगतच्या शेतात जावून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातून वन्यप्राणी व मानवात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी वन विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील चार गावाशेजारील वनालगत १२ किलोमिटरचे पाच लाख ९८ हजार रुपये खर्च करुन प्रायोगिक तत्वावर सोलर कुंपन लावले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावे वनालगत आहेत. यासोबतच त्या गावातील नागरिकांच्या शेतीही वनालगत असल्याने वनातून वन्यप्राणी शेतातील पिकांना मागील कित्येक वर्षापासून हानी पोहचवीत आहे. वन्यप्राण्यांना हुसकविण्यासाठी शेतकरी जागल करीत असतात. परंतु वन्यप्राणी एकट्या शेतकऱ्याला जुमानत नाहीत. वन्यप्राणी शेतात मोठ्या प्रमाणात कळपाने जावून शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत उभ्या पिकाची नासाडी करतात. पिकाच्या नासाडीची नुकसान भरपाई वनविभागाकडून दिली जाते. त्यात शेतकऱ्याचे समाधान होत नाही. वन्यप्राणी शेतातील पिकाकडे जावू नये, यासाठी शेतातील कुंपनात विद्युत प्रवाह सोडणे, विषारी औषधी टाकून ठेवणे, यासारखे अघोरी प्रकार होत असल्याने वन्यप्राण्यासोबत, पाळीव प्राणी व शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसून प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर मात करण्यासाठी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत निंबाळा, शिवणी, वनपरिक्षेत्रअंतर्गत पांढरवाणी, वरोरा वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या केम व रामपूर अशा चार गावांतील वनालगत १२ किमीचे सोलर कुंपन उभारले आहे. या सोलर कुंपनाला वन्यप्राण्यांचा स्पर्श झाल्याबरोबर वन्यप्राण्यास जोरदार शॉक लागतो. त्यामुळे वन्यप्राणी माघारी फिरून पळून जातो. यामध्ये वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत नाही. या सोलर कुंपनामुळे शेतामधील वन्यप्राण्यांचा धुमाकूळ कमी झाला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येत्या काही दिवसांत सर्वच ठिकाणी वनालगत सोलर कुंपन उभारले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)