सौर ऊर्जेवर पेटल्या चुली
By Admin | Updated: May 2, 2015 01:18 IST2015-05-02T01:18:05+5:302015-05-02T01:18:05+5:30
एका दिवसात दोन्ही वेळ मिळून ३६०० व्यक्तींचा स्वयंपाक तयार करावा लागतो.

सौर ऊर्जेवर पेटल्या चुली
वरोरा : एका दिवसात दोन्ही वेळ मिळून ३६०० व्यक्तींचा स्वयंपाक तयार करावा लागतो. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात व प्रदूषण ही समस्या. ही कटकट कायमची संपविण्यासाठी सौर उर्जेचा प्रकल्प उभारून सौर उर्जेवर ३ हजार ६०० व्यक्तींचा स्वयंपाक करण्यात येत आहे. आनंदवनात सदर प्रकल्प उभारण्यात आला असून विदर्भातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे मानले जात आहे.
कर्मयोगी बाबानी आनंदवनाची स्थापना केली. आनंदवनात कुष्ठरोगी बांधवासोबतच अंध, अपंग, वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहत आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळी केली जाते, परंतु जेवन तयार कण्याचे काम एकत्रीत केले जात आहे. याकरिता भव्य हॉल उभारण्यात आला आहे. या हॉलमध्ये १८०० व्यक्ती एकत्र बसून जेवन करण्याची व्यवस्था करण्यात आली. पिण्याचे पाणी व स्वयंपाक गृहही तयार करण्यात आले. लाकूड जाळण्याला कर्मयोगी बाबांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध केला. त्यामुळे आजही आनंदवनात वृक्षतोड व लाकूड जाळले जात नसल्याने निसर्गाचा समतोल कायम आहे. आनंदवनात जेवन तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येतो. परंतु गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करण्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने काही दिवसांपूर्वी एक बायोगॅस प्रकल्प आनंदवनात कार्यान्वित करण्यात आला. बायोगॅस प्रकल्पातून येणाऱ्या गॅसवर मागील काही महिन्यापासून स्वयंपाक तयार सुरू असताना एखाद्या वेळी या प्रकल्पात बिघाड निर्माण होऊन स्वयंपाक तयार करताना अडचणी येऊ नये म्हणून एक सौर ऊर्जेचा प्रकल्प आनंदवनात नुकताच तयार करण्यात आला आहे.
जमिनीपासून ७० फुट उंचीवर हा प्रकल्प उभारला आहे. याला सौर उर्जेच्या प्लेटस् लावल्या आहेत. या प्लेटस् सूर्य ज्याप्रकारे फिरतो त्याप्रकारे त्या प्लेटस् दिवसभर फिरून उर्जा निर्मिती करते. तयार झालेली उर्जा नजीकच्या बॉयरलमध्ये एकत्रीत केल्या जाते. या बायलरमधून तयार झालेली वीज स्वयंपाकासाठी वापरली जाते. याकरिता स्वयंपाकाची भांडी व शेगड्या तयार करण्यात आल्या आहेत.
सौर उर्जेच्या प्रकल्पानजीक हवादर्शक यंत्रही उभारण्यात आले आहे. बायलरमध्ये विशिष्ठ प्रकारे साठविलेली वीज दुसऱ्या दिवशीही स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असल्याने सूर्यनारायणाचे दर्शन एखाद्या दिवशी झाले नाही तरी स्वयंपाकाची अडचण येणार नसल्याची माहिती, सौर उर्जेचे आॅपरेटर दिलीप रॉय यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)