मातीच्या ढिगाऱ्याने केला शेतकऱ्यांचा घात
By Admin | Updated: October 9, 2015 01:42 IST2015-10-09T01:42:26+5:302015-10-09T01:42:26+5:30
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलवून ...

मातीच्या ढिगाऱ्याने केला शेतकऱ्यांचा घात
पिकांना फटका : वेकोलिने नैसर्गिक नालावळवून माती टाकली किनाऱ्यावर
प्रकाश काळे गोवरी
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलवून मानवनिर्मित नाले तयार केल्याने व निघालेली माती नाल्यांच्या किनाऱ्यावर टाकल्याने थोड्याफार पावसाने पाणी सरळ शेतात जाते. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने वेकोलिने केलेल्या प्रतापाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, धोपटाळा, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात दगडी कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आहेत. या परिसरात कोळसा खाणींचे मोठ्या प्रमाणात जाळे असल्याने वेकोलिने अनेक नैसर्गिक जिवंत नाल्यांचे प्रवाह बदलले. कोळसा उत्खनानंतर निघालेले मातीचे महाकाय ढिगारे नाल्यांच्या किनाऱ्यावर टाकल्याने पावसाळ्यातील अल्पश: पावसाने पाणी शेतात शिरते.
पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलला. परिणामी मागील महिन्यात आलेल्या पावसाने दीड-दोनशे एकरातील शेती पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी दोन-तीन दिवस शेतात साचून राहिल्याने हाती आलेले पीक पूर्णत: खराब झाले आहे. पिकांवर मातीचा थर बसल्याने पिकांना पाहिजे, त्या प्रमाणात टवटविपणा राहिला नसल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतीवर अतोनात खर्च केल्यानंतरही वेकोलिच्या दुष्परिणामामुळे हाती आलेले पीक नष्ट होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पुराच्या पाण्यामुळे खराब झालेले पीक दाखविले. मात्र वेकोलि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही.
शेतकऱ्यांची मन समजावणी करीत शेतीची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेली. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना वेकोलिने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही.
वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना जराही विचार न करता मानवनिर्मित नाले व मातीचे ढिगारे निर्माण केल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यावर वेकोलिचे जबाबदार अधिकारी बोलायला तयार नाहीत.