सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:26 IST2018-05-27T22:26:12+5:302018-05-27T22:26:12+5:30
जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत.

सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश
सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत. कुटुंबामधील सासु-सुनांच ‘सख्य’ तर सर्वश्रृत आहे. परंतु, सुनांनी घडवून आणलेल्या सासु-सासºयांच्या लग्न सोहळ्याने एक अनोखा अनुभव चिरादेवी वासीयांना अनुभवायला मिळाला. सासु-सुनांच नात कस असाव, हा सामाजिक संदेश या लग्न सोहळ्यातून देण्यात आला. लग्नाप्रसंगी सासु-सासºयांनी एकमेकांना भरवलेल्या सगुण घासाचा प्रसंग तर खरच आनंददायी ठरला. सोबतच नात्यांची सुंदरता समोर आली.
भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील हनुमान ठाकरे (६८) व रेवता हनुमान ठाकरे (६०) यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्याचे कुटुंबाने ठरवले. या कार्याची जबाबदारी त्यांच्या दोन सुनांनी घेतली. त्याला त्यांच्या दोन मुलींचेही सहकार्य लाभले. हयात असताना सासु-सासºयांना आनंद द्यावा, या भावनेतून लग्नाच्या वाढदिवशी त्यांचे पुन्हा लग्न लावायचे ठरले. रितीरिवाज, रूढी, परंपरेनुसार हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. यामधून सासु-सासºयांच्या प्रती सुनांचे असलेले आदर व प्रेम व्यक्त झाले.
लग्नाचे सर्व सोपस्कार करण्यात आले. आदल्या दिवशी मेहंदीचा तर दुसºया दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला. वधु-वरांना बाशिंग बांधण्यात आले. वराला हनुमान मंदिरापर्यंत नेवून परिसरातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. लग्न सोहळ्यात मंगलाष्टके झालीत. हळदीच्या वेळेस वर-वधूच्या मागे नातू व नातीला त्यांचे आईवडील म्हणून बसविण्यात आले. दुप्पटा ेनातवांनी पकडला. संपूर्ण चिरादेवी गावाला जेवणाच आमंत्रण देण्यात आले होते. जयश्री वासुदेव ठाकरे व लक्ष्मी मोहन ठाकरे या दोन्ही सुनांनी सासु-सासºयांच्या या लग्न सोहळ्याची संकल्पना पुढे आणली. मंदा श्रीकृष्ण वरखडे व रंजना दिलीप सूर या ठाकरे कुटुंबियांच्या मुलींनी या कार्याला सहकार्य केले.
या लग्नसोहळ्याची माहिती आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती. आमच्या सुना व मुलींनी हा आगळावेगळा सोहळा घडवून आणला. आमच्या सुना म्हणजे आमच्या मुलीच आहे. सासु-सुनांच नात प्रत्येक कुटुंबात असच राहो, हीच आमची अपेक्षा आहे.
- हनुमान ठाकरे, रेवता ठाकरे
रा. चिरादेवी