‘तो’ आजही चालतो अनवानी पायाने !
By Admin | Updated: May 7, 2015 01:03 IST2015-05-07T01:03:16+5:302015-05-07T01:03:16+5:30
आजचे युग हे आधुनिक युग आहे. गावखेडे, शहरात झपाट्याने परिवर्तन होत आहे.

‘तो’ आजही चालतो अनवानी पायाने !
शरद देवाडे कान्पा
आजचे युग हे आधुनिक युग आहे. गावखेडे, शहरात झपाट्याने परिवर्तन होत आहे. काळाचा ओघ पाहून मानवी आयुष्यातही बदल घडत आहे. परंतु या आधुनिक काळातही तो बदललेला नाही. येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील ढोरपा येथील विश्वेश्वर लक्ष्मण विधाते (३४) हा युवक अगदी लहानपणापासून अनवानी पायानेच चालत आहे.
महागडे जोडे किंवा चप्पल घालायला कधी मिळेल, या आशेत अनेकजण असतात. मात्र एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या विश्वेश्वर विधाते या युवकाने प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पायात अजूनही चप्पल व जोडे घातलेले नाही. त्याच्या या उपक्रमाने परिसरातील व गावातील लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत असतात. कॉलेजच्या जीवनात मात्र त्याला विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या थट्टेला सामोरे जावे लागले. तेवढे असूनही त्याने जगाची पर्वा न करता आपले एम.ए. पर्यंत शिक्षण ब्रह्मपुरीला पुर्ण केले. आज तो ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र अजूनही त्याने पायात साधी चप्पलही घातलेली नाही. शेतीवर अथवा कोणत्याही कामासाठी भर उन्हातही तो अनवानी पायाने रस्त्यावरुन ये- जा करीत असतो.
एरव्ही लहानपणापासूनच आई- वडिलांकडे चप्पल किंवा जोडे यांचा हट्ट करणारी मुले सर्वत्र दिसून येतात. मात्र विश्वेश्वरला या पादत्राण्याचा मोह कधीच पडला नाही. त्याच्या या अनवानी चालण्यामुळे त्याला स्वत:चे लग्न जोडण्यास त्रास गेला. एकदातर जुळलेले लग्न तुटण्याच्याही मार्गावर होते. चप्पल घालत नाही. त्यामुळे तो वेडा तर नाही ना असा समज मुलीमध्ये निर्माण झाला होता. परंतु एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेला वेडा कसा असू शकतो, हे मध्यस्थीने पटवून दिल्यानंतर त्याचे अखेर लग्न जुळले. मात्र त्याने आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही.
चप्पल न घालता चालल्यानंतर पायाचा व डोक्याचा डायरेक्ट संपर्क येतो. त्यामुळे शरिरातील ऋण भार पायाद्वारे जमिनीत मिसळल्यामुळे त्याला अजून कोणताही आजार झाला नाही, असे त्याचे म्हणणे आहे. पायात चप्पल वा जोडे घालत नसल्याने मनाला हलकेपणा वाटतो व दैनंदिन कामात आळस येत नाही, असेही तो सांगतो. त्याला याबाबत कोणी मार्गदर्शन केले, हे सांगणे तो टाळतो. मात्र हा उपक्रम कधीही मोडीत काढत नाही.