लाकडांसोबत वन्यप्राण्यांची तस्करी
By Admin | Updated: June 12, 2014 23:59 IST2014-06-12T23:59:10+5:302014-06-12T23:59:10+5:30
मध्यचांदा वनविकास महामंडळ सध्या गैरप्रकाराबाबत चांगलेच चर्चेत आले आहे. या महामंडळातील अवैध वृक्षतोडीचा प्रकाराने खळबळ उडवून दिली असतानाच आता दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे.

लाकडांसोबत वन्यप्राण्यांची तस्करी
वनविकास महामंडाळातील प्रकार: प्रकार दडपण्याचा अधिकाऱ्यांकडून प्रयत्न
सुरेश रंगारी - कोठारी
मध्यचांदा वनविकास महामंडळ सध्या गैरप्रकाराबाबत चांगलेच चर्चेत आले आहे. या महामंडळातील अवैध वृक्षतोडीचा प्रकाराने खळबळ उडवून दिली असतानाच आता दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे. सागवानाच्या तस्करीसोबत चक्क वन्यप्राण्यांचीही तस्करी केली जात आहे.
मध्यचांदा ‘वनविकास महामंडळात अवैध वृक्षतोडीचे ग्रहण’ असे वृत्त काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यात १० जूनला प्रभारी सहाय्यक व्यवस्थापक तथा झरणचे वनाधिकारी डी.बी. पूलगमकर यांच्यासह वनकर्मचारी व फिरते पथकाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम राबविली. मात्र त्यात त्यांना केवळ सहा थुट आढळल्याचे सांगण्यात आले. यावरुन वनविकास महामंडळ अवैध वृक्षतोडीबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोड करणारे तृणभक्षक प्राण्यांची शिकारही करीत असतात. शिकार केलेले हे वन्यप्राणी सागवानाच्या लाकडांसोबत बांधून त्याची वाहतूक केली जात आहे. हा प्रकार काहींच्या लक्षात आला. मात्र वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहित होऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१० जून रोजी राबविलेल्या मोहिमेत कोठारीनजीक तोहगाव रोडवर कक्ष क्र. १ मध्ये सागवानाची चोरटी वाहतूक करताना कर्मचाऱ्यांना काही युवक दिसले. कर्मचाऱ्यांना पाहाताच त्यांनी सागवानाचे ओंडके जागेवरच फेकून पसार झाले.
यावेळी देखील सागवानासोबत वन्यप्राण्यांची शिकार करून वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पळून गेलेल्या युवकांचा शोध घेण्याची तसदीही वनाधिकाऱ्यांनी घेतली नाही.
झरण वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. १,२,३, ८०, ८१, ८२ मध्ये प्रचंड प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. यात ३०० ते ४०० वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. त्यात महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोबतच वन्यप्राण्यांच्या शिकारीतही वाढ झाल्याचा प्रकार दिसून आला मात्र वनाधिकारी काहीही झाले नाही, कुठेही वृक्षतोड नाही, असे वरिष्ठांना सांगत झालेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यास वरिष्ठ अधिकारीही सहकार्य करीत आहेत.