एफडीसीएमच्या जंगलातून रेतीची तस्करी
By Admin | Updated: May 22, 2015 01:20 IST2015-05-22T01:20:55+5:302015-05-22T01:20:55+5:30
मध्यचांदा वनप्रकल्प अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे.

एफडीसीएमच्या जंगलातून रेतीची तस्करी
कोठारी : मध्यचांदा वनप्रकल्प अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. याकडे जाणीवपूर्वक वनकर्मचारी दुर्लक्ष करण्याचा देखावा निर्माण करीत आहेत.
कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली क्षेत्रातील कक्ष क्र. ७, ८, ९ व १० मधील जंगलातील नाल्यातून रेतीची दिवसरात्र वाहतूक होत आहे. या क्षेत्रात बांबु कटाईचे काम नाल्याच्या लगत आहे. या कामावर मजूर रोज काम करीत असतात. रोज संबंधित वनरक्षक व वनपाल कामावर हजर असतात. तसे असतानाही मागील दोन महिन्यांपासून सतत नाल्यातून रेतीचा उपसा सुरू आहे. कुडेसावली वनक्षेत्राचा कारभार विपुल आत्राम यांच्याकडे असून त्याचे रेती तस्करासोबत साटेलोटे आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच या क्षेत्रातील नाले रेती उपसा करुन रिकामे होत आहेत. या अधिकाऱ्यांचे ट्रॅक्टर असून सदर ट्रॅक्टरने रोज रेतीचा उपसा करुन साठवणूक करुन तस्करांना विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या जंगल क्षेत्रातील नाल्याची परिस्थिती प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रेती वाहतुकीसाठी तयार रस्ते, नाल्यात खोल खड्डे, जागोजागी रेतीचा उपसा केल्याचे दिसून येते.
रेती तस्करांसोबत हातमिळवणी करुन रेती वाहतूक करणाऱ्या वनपालाची प्रत्यक्ष चौकशी करावी. जंगल क्षेत्राची तपासणी करावी. त्याच क्षेत्रात सुरू असलेल्या बांबु कटाईची चौकशी करावी. म्हणजे अनेक अवैध कामाचा उलगडा होणार आहे. बांबु वाहतुकीसाठी स्वत: भाड्याने ट्रॅक्टर आणून कामे करणे व रात्री जंगली नाल्यातून रेतीचा उपसा करुन रेती तस्करांना विकणे, असा प्रकार सुरू आहे. (वार्ताहर)