तेलंगणातून राजुरा परिसरात दारुची तस्करी

By Admin | Updated: February 2, 2017 00:36 IST2017-02-02T00:36:11+5:302017-02-02T00:36:11+5:30

तेलंगाना राज्य सीमेलगत लक्कडकोट गाव लागून असल्याने या गावातील काही युवकांनी दारु तस्करीत उडी घेतली आहे.

Smuggling in Telangana Rajura area | तेलंगणातून राजुरा परिसरात दारुची तस्करी

तेलंगणातून राजुरा परिसरात दारुची तस्करी

पोलिसांचे दुर्लक्ष : लक्कडकोट ठरले दारुविक्रेत्यांचे झोन
राजुरा : तेलंगाना राज्य सीमेलगत लक्कडकोट गाव लागून असल्याने या गावातील काही युवकांनी दारु तस्करीत उडी घेतली आहे. गर्भश्रीमंत होण्याचा हा ‘शॉर्टकट’ मार्ग असल्याने त्यांनी या अवैध मार्गाला रोजगाराचा पर्याय दिला आहे. त्यामुळे तेलंगाना राज्यातील भन्नाटा व वाकडीमधून दारु तस्करीला उधाण आले आहे.
या तस्करांमुळे शहरासह धोपटाळा वेकोलि क्षेत्र, देवाडा, सास्ती, आर्वी, चुनाळा या गावात दारुचा पाट वाहत आहे. पोलिसांसोबतच्या मधूर संबंधामुळे त्या तस्कराची दबंगगिरी दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या तस्कराला जेरबंद करण्याचे मोठे आवाहन दारुबंदी पथकापुढे तस्कराची हिंमत वाढली असून त्यांनी दिवसाढवळ्या खुलेआम दारु तस्करी सुरू केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारु तस्करी होत असतानासुद्धा हा गोरखधंदा पोलिसात दिसत नसल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात दारुबंदी होताच दारु तस्करी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्हा व आंतरराष्ट्रीय सीमेवर पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.
विशेष पथकाच्या माध्यमातून तस्करांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. पण पथक व तैनातीमधील काही ‘भेदी’ पोलिसामुळे निर्ढावलेले तस्करच पोलिसांवर भारी पडत असल्यााचे पहायला मिळत आहे. त्यामुळे इमानदार पोलिसांची मोठी पंचाईत होत आहे. येथील ठाणेदार इंगळे यांनीसुद्धा दारुविक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. तस्करांवर कारवाईचे सक्त संकेत दिले आहे. पण याच विभागातील काही खादाड पोलिसामुळे दारु तस्करी जोमात सुरू आहे.
मागील आठवड्यात आर्वी जंगलालगत दारुची गाडी पकडल्याची चर्चा आहे. पण चिरीमिरी घेऊन त्याला सोडून देण्यात आल्याचे समजते. हा तस्कर लक्कडकोटचा असल्याची माहिती पुढे आली आहे. लक्कडकोटच्या ‘त्या’ दारु तस्कराकडे तीन गाड्या असून याच गाड्यामधून मोठ्या प्रमाणात दारु पेट्याची तस्करी होत आहे.
सोंडो, सुकमडपल्ली, भुरकुंडा, खामोना, आर्वीॅ या आडमार्गाने दारुची तस्करी सुरू आहे. मागणीनुसार खेडेगावातील दारु विक्रेत्यांना दारुपुरवठा करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Smuggling in Telangana Rajura area