चुनाळा घाटाच्या वर्धा नदीपात्रातून रेतीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:31 IST2021-05-25T04:31:43+5:302021-05-25T04:31:43+5:30

राजुरा : महसूल मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाळा गावालगतच्या वर्धा नदीपात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असून, ...

Smuggling of sand from Wardha river basin of Chunala ghat | चुनाळा घाटाच्या वर्धा नदीपात्रातून रेतीची तस्करी

चुनाळा घाटाच्या वर्धा नदीपात्रातून रेतीची तस्करी

राजुरा : महसूल मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाळा गावालगतच्या वर्धा नदीपात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असून, गाव परिसरातील ४ ते ५ रेती तस्करांनी चुनाळा घाटावर हल्लाबोल केला आहे. हा गोरखधंदा काही महिन्यांपासून अविरतपणे सुरू असतानाही महसूल विभागाला दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या तालुक्यात रेतीचा तुटवडा असून, मागणी वाढली आहे. परिसरात शासकीय कामांसह खासगी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रेती तस्कर सक्रिय झाले आहेत. आता काही दिवसांवर पावसाळा आल्याने बांधकामे पूर्ण करण्याची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे आजघडीला प्रतिट्रॅक्टर चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत आहेत. दिवसागणिक मागणी वाढत असल्याने रेती तस्करांनी आता वर्धा नदीवर धुमाकूळ घातला आहे. सध्या वर्धा नदीच्या चुनाळा घाटावर चुनाळासह राजुरा शहरातील चार ते पाच रेती तस्करांनी नदीपात्रात मोठमोठे खड्डे खोदून रेतीउपसा सुरू केला आहे. त्यांचा हा गोरखधंदा मागील काही महिन्यांपासून बेधडकपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात हाकेच्या अंतरावर नदीत रेती तस्करीला ऊत आला असतानाही महसूल कर्मचारी गप्प बसल्याने संशय बळावला आहे. या तस्करांचा दिवसागणिक उपद्रव वाढत असल्याने भविष्यात हेच तस्कर महसूल विभागावर भारी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Smuggling of sand from Wardha river basin of Chunala ghat