कोळशाच्या ट्रकमधून होतेय दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 00:31 IST2016-03-02T00:31:02+5:302016-03-02T00:31:02+5:30

जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू विक्रेत्यांनी दारू तस्करीसाठी नवनवे फंडे वापरणे सुरू केले आहे.

Smuggled liquor from a coal truck | कोळशाच्या ट्रकमधून होतेय दारूची तस्करी

कोळशाच्या ट्रकमधून होतेय दारूची तस्करी

नवा फंडा : पोलीस यंत्रणाही झाली बेजार
गोवरी : जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू विक्रेत्यांनी दारू तस्करीसाठी नवनवे फंडे वापरणे सुरू केले आहे. दारू व्यवसायातून दामदुप्पट नफा कमविण्याच्या उद्देशाने पोलिसांची दिशाभूल करीत अवैध दारू जिल्ह्यात आणून ती विकण्याचा सपाटा सुरू आहे. आता तर चक्क कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून दारूची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उजेडात आल्याने पोलीस यंत्रणाही दणाणून गेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन ११ महिन्यांचा कालावधी लोटला. दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या व जिल्ह्याच्या सिमेवर पोलीस तपासणी नाके उघडण्यात आले. यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी करीत अनेक दारू तस्करांना अटक करून कारवाई करण्यात आली. दारू विक्रीच्या काळ्या व्यवसायात चौपट नफा कमविण्याच्या उद्देशाने या दारू तस्करीच्या धंद्यात तरूण बेरोजगारांची फौज उतरली आहे.
दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात दारूचा थेंबही मिळणार नाही, अशी चर्चा सर्वच स्तरावर झाली. मात्र त्या उलट चित्र जिल्ह्यात आहे. मोबाईलवरून आॅर्डर दिली की, दारू थेट तुमच्या दारापर्यंत आणून पोहचविली जात आहे. हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून दारू जिल्ह्यात आणण्याचा सपाटा दारू तस्करांनी लावला आहे. यात आडमार्गाने दारू आणून ती गावागावांत विकल्या जात आहे. हे दारू तस्कर परजिल्ह्यातून दारू आणण्यासाठी नवनवे फंडे वापरत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणाही हैराण आहे. आता तर चक्क कोळशाच्या ट्रकमधून दारूची तस्करी केली जात आहे.
बहुतांश ट्रक कोळसा घेऊन जिल्ह्याबाहेर किंवा परप्रांतात जातात. याच संधीचा फायदा घेऊन दारू तस्करांनी कोळशाच्या ट्रकमधून दारू आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. दामदुप्पट नफा कमविण्याच्या उद्देशाने या व्यवसायात लहानापासून थोरापर्यंत अनेकजण गुंतले आहेत.
राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी या वेकोलिच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा महापूर वाहत आहे. काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास राजरोसपणे दारू आणून विकली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Smuggled liquor from a coal truck