चंद्रपुरात धुव्वाधार

By Admin | Updated: June 20, 2015 01:54 IST2015-06-20T01:54:08+5:302015-06-20T01:54:08+5:30

गुरूवारी रात्री चंद्रपुरात अतिवृष्टीने कहर केला. रात्री ११ वाजताच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस रात्री साडेबारा वाजेपर्यंत धुव्वाधार कोसळत होता.

Smokhadhar in Chandrapur | चंद्रपुरात धुव्वाधार

चंद्रपुरात धुव्वाधार

चंद्रपूर : गुरूवारी रात्री चंद्रपुरात अतिवृष्टीने कहर केला. रात्री ११ वाजताच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस रात्री साडेबारा वाजेपर्यंत धुव्वाधार कोसळत होता. अशातच संपूर्ण शहरातील विज पुरवठाही ठप्प झाला. सुरूवातीला पावसाचा वेग लक्षात आलाच नाही. या एक तासात ७४ मि.मी.पावसाची नोंद झाली. वारा आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या या अतिवृष्टीने शहरातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडविली.
पावसामुळे बाजारपेठेतील तळमजल्यावरील अनेक दुकानात पाणी शिरले. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यांवर जवळपास दोन ते तीन फुट पाणी साचले होते. स्थानिक गोलबाजारातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानात पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य आले होऊन नुकसान झाले.
मुसळधार पाऊस सुरू असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास स्थानिक रामनगर फिडरवर तांत्रिक बिघाड झाल्याने रामनगरसह हवेली गार्डन, बापटनगर, स्नेहनगर, वडगाव या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. पाऊस थांबल्यानंतर नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत तांत्रिक बिघाडाचा शोध घेऊन दुरूस्ती केली. त्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला. आझाद बाग चौक परिसरातील दुकानांमध्ये नेहमीप्रमाणे रात्री पाणी शिरले.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना असलेली पावसाची प्रतीक्षा अखेर संपली. गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. (प्रतिनिधी)
विजांच्या कडकडाटाने नागरिक हादरले
पाऊस सुरू असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट झाला. हा आवाज इतका मोठा होता की, नागरिक क्षणभर हादरून गेले. जवळपास कुठे वीज पडली असावी, असा अंदाज घेत अनेकांनी विजेवर चालणारी उपकरणे व मोबाईल बंद करून टाकले.
रस्ते झाले जलमय
मुसळधार पावसामुळे शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, जयंत टॉकीज, सीटी हायस्कूल, श्री टॉकीज, गंजवॉर्ड, गोलबाजार, बिनबा रोड, तुकूम परिसरातील वाहतूक कार्यालय, ऊर्जानगर मार्ग हे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक वाहने रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे मुसळधार पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.
शेकडो घरांत पाणी शिरले
गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने शहरातील एमईल प्रभागातील इंदिरानगर परिसरातील नागरिकांची झोप उडविली. या भागातील अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. त्यामुळे त्यांना रात्रभर जागरण करावे लागले. या प्रभागात दरवर्षीच पावसाचा फटका बसतो. मात्र मनपा प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. . गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर शुक्रवारी सकाळी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, नगरसेविका अंजली घोटेकर, या प्रभागाच्या नगरसेविका वनश्री गेडाम यांनी पाणी शिरलेल्या घरांची पाहणी केली. पावसापूर्वी मनपाने या परिसरात उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही.

Web Title: Smokhadhar in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.