खिन्न पुतळे अन् सुस्त यंत्रणा
By Admin | Updated: January 17, 2016 00:55 IST2016-01-17T00:55:59+5:302016-01-17T00:55:59+5:30
देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, समाजातील अनिष्ठ रुढी परंपरेविरुध्द ज्यांनी लढा दिला, ज्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य झिजविले,...

खिन्न पुतळे अन् सुस्त यंत्रणा
चंद्रपूर : देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, समाजातील अनिष्ठ रुढी परंपरेविरुध्द ज्यांनी लढा दिला, ज्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य झिजविले, त्यांचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत रहावे, यासाठी या महापुरुषांचे पुतळे शहरात उभारण्यात येतात. चंद्रपुरातही अनेक ठिकाणी थोरुपुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांमुळे त्यांच्या कार्याचे नागरिकांना तर स्मरण होत आहे. मात्र मनपा प्रशासनाला मात्र पुतळ्यांच्या स्वच्छतेचा व देखभालीचाच विसर पडल्याचे पुतळ्यांच्या दुर्दशेवरून दिसत आहे.
येथील जटपुरा गेटवरील वसंत भवनासमोर असलेला स्व. मा.सा. कन्नमवार यांचा पुतळा त्यांच्या जन्मदिनीही स्वच्छ करण्याचे सौजन्य महापालिकेने दाखविले नाही. यामुळे अनेक नागरिकांनी लोकमतजवळ खंत व्यक्त केली. स्व. कन्नमवार यांच्या जयंतीदिनी बेलदार समाज संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक अभिवादनासाठी गेले असता पुतळ्याभोवती मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून आला. नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला महानगर पालिकेकडून पाण्याचे टँकर लावून पुतळे स्वच्छ केले जातात. तेवढीही औपचारिकता मनपाने पार पाडली नव्हती. अखेर अभिवादनासाठी आलेल्या काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बेलदार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नळावरून पाणी घेवून पुतळा धुतला आणि परिसरातील घाण स्वच्छ केली. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करून, नव्हेतर सतत तीन दिवस याविषयी वृत्तमालिकाच प्रकाशित करून मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि स्व. मा.सा. कन्नमवार यांचा पुतळा परिसर स्वच्छ झाला. मात्र इतर पुतळ्यांचे काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने आज शनिवारी शहरात फेरफटका मारला असता अनेक पुतळे आपल्या दुर्दशेवर रडत असल्याचे दिसून आले.
येथील भिवापूर मार्गावरील हनुमान खिडकीजवळ महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. पुतळा उभारल्यानंतर त्याच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत या पुतळ्याची दुर्दशा कायम होती. त्यानंतर समाजबांधवांनी ११ एप्रिल २०१५ रोजी या परिसराची स्वच्छता केली. पुतळ्याची रंगरगोटी केली होती. काही दिवस पुतळा चांगल्या स्थितीत दिसून आला. आता पुन्हा या ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. आझाद बगिचाला लागून विश्वेश्वराव महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचीही अनेक वर्ष दुर्दशा कायम राहिली. आजही या पुतळा नियमित स्वच्छ केला जात नाही. विशेष म्हणजे, या पुतळ्याच्या मागेच महानगरपालिकेने कचराकुंडी ठेवली आहे. मुतारी म्हणूनही या जागेचा वापर होतो. त्यामुळे पुतळ्याच्या मागे नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरले असते.
रामनगर मार्गावरील संत कंवलराम चौकातील संत कंवलराम यांच्या पुतळ्याचीही नियमित स्वच्छता होत नाही. या परिसरातही काहीवेळा घाण दिसून येते.
बाबुपेठ प्रभागातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचीही नीट देखभाल होत नसल्याचे दिसून आले. या पुतळ्याचीही नियमित स्वच्छता होत नसल्याचे सांगण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी अनेक पुतळे शहरात आहेत, त्यातील काही पुतळ्यांची दुर्दशा आजही कायम आहे. (शहर प्रतिनिधी)