वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

By Admin | Updated: May 29, 2017 00:27 IST2017-05-29T00:27:39+5:302017-05-29T00:27:39+5:30

येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Slaughter of trees for tree plantation | वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

१० ते १५ वर्षांची झाडे : येरुर ग्रामपंचायतीचा प्रताप
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी वृक्षारोपणाच्या नावाखाली जुनी झाडे मुळासकट उपटून टाकण्याचा हा प्रकार येरुर ग्रामपंचायतीने केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रदूषण, तिव्र उष्णतामान यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण मात्र मागील अनेक वर्षांपासून कमी झालेले नाही. आणखी ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारखान्यांमुळे वनसंपदा नष्ट होत असून उष्णतामानातही वाढ होत आहे. उन्हाळ्यात राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे नोंदविले जाते. यावर्षीही चंद्रपूरने आपला हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून शासनाच्या वतीने वृक्षलागवडीचा व्यापक उपक्रम मागील वर्षी राबविण्यात आला. यंदाही याची व्याप्ती आणखी वाढवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
एकीकडे वृक्षलागवडीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे १० ते १५ वर्ष वयाची जिवंत झाडे तोडली जात आहे. येरुर ग्रामपंचायतीने येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी येरुर-ताडाळी या रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुने २० फूट अंतरावर डौलात उभी असलेली झाडे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी येरुर ग्रामपंचायतीने याला बगल दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या या कृत्याचा येरुर येथील परशुराम नरसू निखाडे व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येरुर ग्रामपंचायतीने मोठी प्रसिध्दी मिळविण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेली ही झाडे तोडल्याचा आरोप निखाडे यांनी केला आहे. रस्त्याच्या बाजुने २० फूट अंतरावरील झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जेसीबीनेच खड्डे खोदण्यात येत आहेत.या संदर्भात निखाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात मोका चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सागवानाची शेकडो झाडे तोडली
जिवती तालुक्यातील येरमीयेसापूर येथील संतोष पेठे व अशोक पेठे यांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या जागेवर असलेली सागवानाची शेकडो झाडे पेठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भुलथापा देऊन तोडल्याचा आरोप येरमीयेसापूर येथील गोविंदराव कुमरे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Slaughter of trees for tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.