वेकोलिच्या माध्यमातून दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार
By Admin | Updated: November 19, 2015 01:17 IST2015-11-19T01:17:44+5:302015-11-19T01:17:44+5:30
वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेडच्या माध्यमातून चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वेकोलिचे अध्यक्ष ...

वेकोलिच्या माध्यमातून दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार
विदर्भातील लघु उद्योगांना अॅन्सिलरी युनिटचा दर्जा : सुधीर मुनगंटीवार आणि वेकोलिचे सीएमडी यांच्या बैठकीत निर्णय
चंद्रपूर : वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेडच्या माध्यमातून चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत घेण्यात आला. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना वर्षभरात विविध विभागांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
१७ नोव्हेंबर रोजी वेकोलिच्या नागपूर मुख्यालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांची बैठक झाली. या बैठकीत वेकोलिच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीमुळे नागरिकांना सहन करावे लागणारे प्रदूषण लक्षात घेता सामाजिक दायित्व म्हणून दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करून त्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना प्रशिक्षित करण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत केली. त्यानुसार दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय प्रबंध निदेशक मिश्रा यांनी घेतला.
‘मेक इन चंद्रपूर’ या घोषणेच्या अनुषंगाने वेकोलिने विदर्भातील लघु उद्योगांना ‘अॅन्सिलरी युनिट’ म्हणून दर्जा देण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विदर्भातील लघु उद्योगांना अॅन्सिलरी युनिट म्हणून रजिस्ट्रेशन देण्यात येईल, असे आश्वासन वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांनी दिले.
या माध्यमातून ४०० च्यावर वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या विदर्भातील अनेक लघु उद्योजकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चिमूरच्या क्रीडांगणासाठी पाच कोटींचा निधी
चिमूर येथे १९९४ मध्ये वेकोलिच्या माध्यमातून क्रीडांगणाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र निधीच्या उपलब्धतेअभावी या क्रीडांगणाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. या क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. या क्रीडांगणासाठी ५ कोटी रुपये वेकोलिच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांनी यावेळी सांगितले.