शासकीय लसीकरणात सहा वर्षीय मुलगी आजारी
By Admin | Updated: December 9, 2014 22:47 IST2014-12-09T22:47:30+5:302014-12-09T22:47:30+5:30
शासकीय रुग्णालयाच्या चमूने वरोरा येथील खाजगी शाळेत लसीकरण कार्यक्रम घेतला. या लसीकरणानंतर शाळेतील सहा वर्षाची मुलगी आजारी पडली असल्याने आरोग्य यंत्रनेत खळबळ उडाली आहे.

शासकीय लसीकरणात सहा वर्षीय मुलगी आजारी
वरोरा : शासकीय रुग्णालयाच्या चमूने वरोरा येथील खाजगी शाळेत लसीकरण कार्यक्रम घेतला. या लसीकरणानंतर शाळेतील सहा वर्षाची मुलगी आजारी पडली असल्याने आरोग्य यंत्रनेत खळबळ उडाली आहे. आजारपणामुळे मुलीचे पालक चिंताग्रस्त असून मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वरोरा शहरातील खाजगी विद्यालयात धर्नुवात, डांग्या खोकला व घटसर्प हे आजार विद्यार्थ्याना होवू नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय चमूच्या वतीने लसीकरण करण्यात आले. त्यात १०० विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण झाल्याच्या दोन दिवसानंतर एक सहा वर्षीय विद्यार्थीनी एकदम आजारी पडली.
मुलीला मानेचा आजार जडला असून मुलीची मान एक आठवडा लोटूनही सरळ झालेली नाही. तिच्या पालकांने सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेवून उपचार केला. तेव्हा लसीकरणातून आजार जडला असल्याचा संशय व्यक्त केला. परंतु,
पालकांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. ही बाब वरोरा शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना माहित होताच त्यांनी मुलीला व तिच्या पालकांना घेवून उपजिल्हा रुग्णालय गाठून सदर प्रकार वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर टाकला.
यावेळी या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार करुन आवश्यकता भासल्यास चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्याचे आश्वासन देत संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)