लोकतम न्यूज नेटवर्कउपरी : घरकुलासाठी मिळणारे तटपुंजे अनुदान, रेतीचे वाढलेले दर यामुळे सावली तालुक्यात वर्ष २०१६-१७ ते २०२३-२०२४ कालावधीतील चार हजार ६५२ घरकुल अपूर्ण असल्याचे वास्तव आहे. त्यातच नव्या वर्षात सहा हजार ९३ नवे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, एक लाख ४० हजार रुपयांत घर बांधकाम कसे, असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना भेडसावत आहे.
गोरगरीब जनतेला पक्के घरे देण्यासाठी शासनाच्या जनकल्याणाकारी योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. त्यात रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण, प्रधानमंत्री घरकुल योजना आहे. या योजनेअंतर्गत अपंग, विधवा, परित्यक्तासह गरीब, गरजू लोकांना पक्के घरासाठी अनुदान दिले जाते. सावली तालुक्यात यंदा पंतप्रधान आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सहा हजार ९३ घरकुले मंजूर झाली. मात्र, घरकुल बांधकामासाठी केवळ एक लाख ४० हजार रुपयांचे अनुदान दिले जात असल्याने एवढ्याशा रकमेत घर बांधायचे कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. मागील काही वर्षात मंजूर झालेली चार हजार घरकुले तटपुंजा अनुदानाने अपूर्ण आहेत, याही लाभार्थ्यांना अशीच समस्या उद्भवण्याची शक्यता लाभार्थ्यांनी वर्तवली आहे.
६०० रुपये रेतीचे काय झाले?शासनाने रेती धोरणाअंतर्गत ६०० रुपयांत रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र, ती घोषणा हवेतच विरली आहे. याचा गैरफायदा घेत अनेक ट्रॅक्टरचालक रेतीची चोरी करून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक करून चढ्या दराने विक्री करत आहेत. घरकुल लाभार्थ्यांना वाढलेल्या दरात रेती खरेदी करणे कठीण जात आहे.
"सावली तालुक्यात पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांद्वारे गरजूंना घरकुल मंजूर झाले. अनेकांचे बांधकाम सुरू आहे; परंतु सध्या रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीचा दुष्काळ दिसत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन रेती उपलब्ध करून द्यावी."- राकेश गड्डमवार, माजी सभापती पं.स. सावली