साहेब, कसं पण करा पण ऑक्सिजन बेड द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:29+5:302021-04-19T04:25:29+5:30

चंद्रपूर : साहेब, ऑक्सिजन बेड कुठे आहे, व्हेंटिलेटर कुठे मिळेल, कसं पण करा पण एक बेड मिळवून द्या, ...

Sir, do something but give an oxygen bed | साहेब, कसं पण करा पण ऑक्सिजन बेड द्या

साहेब, कसं पण करा पण ऑक्सिजन बेड द्या

चंद्रपूर : साहेब, ऑक्सिजन बेड कुठे आहे, व्हेंटिलेटर कुठे मिळेल, कसं पण करा पण एक बेड मिळवून द्या, पैसा किती पण लागू द्या, नाही तर याचा जीव जाईल, अशा प्रकारचे एक ना शेकडो फोन येथील काॅलसेंटरमध्ये खणखणत आहेत. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्ण जास्त आणि बेडची संख्या कमी अशी काहीशी अवस्था जिल्ह्यात बघायला मिळत आहे. परिणामी, प्रत्येक रुग्ण सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काॅलसेंटर सुरू केले असून या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती दिली जात असून त्यांना या माध्यमातून आधार मिळत आहे. दिवसा कमी फोन येत असले तरी काॅलसेंटरवर रात्रीच्या वेळी सारखा फोन खणखणत आहे.

प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक काळजीत आहेत. अनेकवेळा येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करीत आहे. मात्र, जे-जे प्रयत्न करायला पाहिजे, ते-ते सर्व प्रयत्न येथील कर्मचारी करीत आहे. अधिकाधिक नातेवाईक बेड उपलब्धतेबाबत विचारपूस करीत आहेत. तर, रेमडेसिविर इंजेक्शनसाठीही अनेकांचे फोन येथे येत आहेत. त्यामुळे कर्मचारी उपलब्धतेनुसार त्यांना माहिती देत आहे. या कक्षामध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असून विविध विभागांतील २५ जण येथे आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कक्षासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर भट्टाचार्य, डाॅ. अखिल कुरेशी, विस्तार अधिकारी सांख्यिकी धनंजय पाल यांच्यासह अन्य कर्मचारी कार्यरत आहेत.

बाॅक्स

काहींच्या धमक्याही

रुग्णांच्या नातेवाइकांकडून कोरोना काॅलसेंटरला फोन केल्यानंतर अनेकवेळा काही जण येथील कर्मचाऱ्यांना धमक्याही देत आहेत. यामध्ये बेड नाही तर येथे बसले कशाला, तुम्हाला पाहून घेईल, कुठे येऊ सांगा, यासोबत अर्वाच्य शब्दांत अनेकवेळा कर्मचाऱ्यांना बोलले जात आहे.

बाॅक्स

ऐकण्याशिवाय पर्याय नाही

रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होऊ नये, यासाठी काॅलसेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण काॅलसेंटरला फोन करतात. यामध्ये त्यांची अपेक्षा असते. मात्र, प्रत्येक वेळा त्यांची मागणी पूर्ण होईलच, हे सांगता येत नाही. जे-जे प्रयत्न काॅलसेंटरमधून करायला पाहिजे, ते पूर्ण केले जाते. मात्र, अनेकवेळा नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना ऐकून घेतल्याशिवाय पर्याय नसतो.

बाॅक्स

शिफ्टमध्ये चालते काम

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काॅलसेंटर सुरू केले आहे. सदर सेंटर २४ तास सुरू राहते. यामध्ये तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतात.

बाॅक्स

सेंटरमधून अशी मिळते मदत

शासकीय, खासगी रुग्णालयांतील बेडची उपलब्धता, लसीकरणाचे स्थळ, कोरोना आजाराबाबत योग्य मार्गदर्शन, यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना तसेच नव्याने कोरोनाबाधित आढळून आलेल्यांना दररोज फोनद्वारे त्यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेतली जाते.

बाॅक्स

कुणाला ऑक्सिजन तर कुणाला इंजेक्शन हवे

रुग्णसंख्या वाढत असून बेडसंख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाची सध्या धावपळ सुरू आहे. असे असतानाच काॅलसेंटरमधून मदत मिळेल, या आशेने कुणी ऑक्सिजन बेड तर काही जण रेमडेसिविर इंजेक्शनसाठी संपर्क साधत आहे. येथील कर्मचारी माहिती घेऊन संबंधितांना कुठे काय आहे, यासंदर्भात माहिती देत आहेत.

बाॅक्स

सारेच अपुरे

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर कमी आहेत. त्यामुळे प्रत्येकाला सुविधा पुरविणेही सद्य:स्थितीत शक्य नाही.

Web Title: Sir, do something but give an oxygen bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.