जिल्हा रुग्णालयासमोर ‘वंचित’चे मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:06+5:302021-04-18T04:27:06+5:30
चंद्रपूर : कोविड रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू ...

जिल्हा रुग्णालयासमोर ‘वंचित’चे मूक आंदोलन
चंद्रपूर : कोविड रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीची दुसरी लाट राज्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढत असून, कोविड रुग्णांना आरोग्याच्या सोयीसुविधांअभावी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्णांना जीवसुद्धा गमवावा लागला. ही परिस्थिती भयंकर असून रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाहीत. राज्य शासनाने आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही महत्त्वाचे पावले उचलली नाहीत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात यावेत. तालुकास्तरावर आधुनिक कोविड सेंटर उभारण्यात यावे, जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर तत्काळ सुरू करावे, सर्व खासगी रुग्णालये सरकारने ताब्यात घेऊन रुग्णांचे मोफत उपचार करण्यात यावेत, या मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी ‘वंचित’चे राजू झोडे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, संपत कोरडे, बंडू ठेंगरे, नितीन रामटेके, कृष्णा पेरकावार, सुभाष थोरात, अशोक पेरकावार, अक्षय लोहकर, विष्णू चोपडे, गुरू कामटे, विशेष निमगडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.