ठिय्या आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: May 31, 2017 01:49 IST2017-05-31T01:49:40+5:302017-05-31T01:49:40+5:30

तालुक्यात दिवसेंदिवस वाघाच्या हल्ल्यात वाढ होत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sign of strike movement | ठिय्या आंदोलनाचा इशारा

ठिय्या आंदोलनाचा इशारा

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा : सात दिवसांचा अल्टीमेटम
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : तालुक्यात दिवसेंदिवस वाघाच्या हल्ल्यात वाढ होत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असूनसुद्धा वनविभागाकडून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी किसान सभा नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा ५ जुनला ब्रह्मपुरीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा उपवनसंरक्षक ब्रम्हपुरी वनविभागाचे कुलराजसिंह यांच्यामार्फत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
मागील दीड महिन्यांपासून ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा हळदा, बोडधा, मुडझा, बल्लारपूर, कुडेसावली, पद्मापूर, भुज, आवळगाव, कोसंबी व मुरपार परिसरात नरभक्षक वाघाने अनेकांवर हल्ला केला आहे. मात्र वनविभागांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील जनतेमध्ये वनविभागाप्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील जनतेनी सोबतच उपविभागीय अधिकारी उमेश काळे ब्रह्मपुरी, तहसीलदार चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले.
नरभक्षक वाघाने १९ मे रोजी बोडघा येथील क्षिरसागर गजानन ठाकरे या महिलेला ठार केले तर त्यापूर्वी १८ मे रोजी हळदा येथील मंगला ईश्वर आवारी या महिलेला गंभीर जखमी केले. २४ मे रोजी बल्लारपूर येथील देविदास किसन भोयर यांना जखमी केले. २६ मे रोजी हळदा येथील गिरीधर मोरांडे हे वाघाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. १८ एप्रिल रोजी कुडेसावली येथील सोनू दडमल यांना जखमी केले. १३ एप्रिल रोजी हळदा येथील खुळशिंगे यांना जखमी केले तर १० फेब्रुवारी रोजी पद्मापूर येथील श्रीधर किसन मेश्राम यांना गंभीर जखमी केले आहे.
या परिसरात शेतात काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यांवर व जनावरे चारण्याकरिता जंगलात गेलेल्या गुराख्यांवर तसेच गाय, बैल, शेळ्या यांचेवर सातत्याने वाघाचे हल्ले होत आहेत. ज्यामध्ये २० मे रोजी यादव दिवटे बल्लारपूर यांची शेळी व बकरा, १६ मे रोजी प्रभाकर दिवटे बल्लारपूर यांची म्हैस, १५ मे रोजी रमेश मोहुर्ले बल्लारपूर यांचा बैल, १२ मे रोजी यशवंत कोटगले बल्लारपूर यांची शेळी वाघाने ठार केली तर १२ मे रोजी हळदा येथील लतीफ बोबाटे यांचा गोरा जखमी केला तर नुकतेच २५ मे रोजी बोडधा येथे रात्री १२ वाजता दोन वाघांनी गावात घुसून धुमाकुळ घातला. त्यामुळे सदर गाव परिसरातील जनता वाघाच्या दहशतीमुळे शेतीचे कामास सुरुवात झाली असूनसुद्धा शेतीकाम करण्याकरिता शेतावर जाण्यास घाबरत आहेत. तर परिसरातील जनता तेंदूपत्ता गोळा करायला जाण्यास तयार नाही. या परिसरातील गुराख्यांनी गुरे चारणेसुद्धा बंद केले आहे.या घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक यांनी तातडीने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, हल्ल्यात मृत पावलेल्यांना व जखमींना त्वरीत मदत द्यावी अन्यथा ५ जून रोजी ब्रह्मपुरीच्या वनविभाग कार्यालयात मुक्कामी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Sign of strike movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.