दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:43 IST2019-05-27T22:43:32+5:302019-05-27T22:43:57+5:30
शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.
सकाळी ९ वाजतापासूनच सूर्य आग ओकत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाही-लाही होत आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली असून उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत राहणार आहे. दररोज सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणे कठिण झाले आहे. तापमाणात प्रचंड वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात शेतशिवारात शेतकरी, शेतमजूर दुपारपर्यंत काम करीत असून दुपारी घरी परतत आहे. शहरातील नागरिक उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वातानुुकुलित यंत्रासोबत कुलर, पंख्याचा वापर करीत आहेत. परंतु उष्णतेचा उकाडा त्यालाही जुमानत नसल्याची स्थिती आहे. एकंदरीत नवतपाची उष्णता अंगाची लाहीलाही करीत आहे.
दुपारी घराबाहेर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असून शक्यतो जाणे टाळावे.
उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तुंची मागणी वाढली
वाढत्या प्रदूषणापासून तसेच उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्स, टोपी, सनकोेटची मागणी वाढली आहे. तरूणांची आवड ओळखून बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. वातावरणाच्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हामुळे डोळ्यात जळजळ, सुजणे, लालसर होणे, डोळ्यांना थकवा जाणवणे, डोकेदुखी, बधिरपणा येणे, अशाप्रकारचा त्रास होत आहे.
उन्हाळा झाला नकोसा
एप्रिल महिन्यापासूनच पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे. त्यात नवतपाला सुरुवात होताच पहिल्याच दिवसापासून म्हणजेच शनिवारपासून तापमानात आणखीच वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे पंखा तसेच कुलरची हवाही गरम येत असल्याने नागरिकांना उन्हाळा नकोसा झाला आहे.
हवामान विभागाने नवतपामध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कूलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागत आहे. एसीची क्षमताही कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.