पाथरी-विहीरगाव मार्गावर झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:03+5:302021-01-10T04:21:03+5:30

सावली : तालुक्यातील पाथरी-विहीरगाव रस्त्यावर अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येत आहे. वन ...

Shrubs on Pathri-Vihirgaon road | पाथरी-विहीरगाव मार्गावर झुडपे

पाथरी-विहीरगाव मार्गावर झुडपे

सावली : तालुक्यातील पाथरी-विहीरगाव रस्त्यावर अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येत आहे. वन विभागाने रस्त्यावर आलेली झाडे तोडावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते.

भटक्या जमातीतील कुटुंबांना भूखंड देण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घरबांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वाकलेले विद्युत खांब ‘जैसे थे’च

चंद्रपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युत खांबे वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसापासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

थ्री-जी सेवा नावापुरतीच

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.

राजुरा-नागपूर बससेवा पूर्ववत करा

गडचांदूर : राजुरा येथून कोरपना, वणीमार्गे नागपूरसाठी लाॅकडाऊनपूर्वी थेट बससेवा होती. मात्र ती अद्यापही पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरून नागपूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. हा मार्ग अगदी कमी अंतराचा व सोयीस्कर असल्याने प्रवासी याच मार्गे जाणे पसंत करतात. राजुरा आगार व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था

कोरपना : तालुक्यातील रूपापेठ फाटा-खडकी, परसोडा-रायपूर, कोठोडा खु.-गोविंदपूर, धोपटाला-शेरज बु. - पिपरी, नारांडा - पिपरी, कोडशी खु. -पिपरी, कातलाबोडी-बोरगाव, कन्हाळगाव-कोरपना-कुसळ, खैरगाव- कोरपना, सावलहिरा-येल्लापूर्, हातलोणी-घाटराई, टांगाला सावलहिरा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

तुळशीनगराची पाण्यासाठी भटकंती

चंद्रपूर : येथील वृंदावन व कृषिनगर वाॅर्डामध्ये अद्यापही नळ योजना आली नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सिटी बस सुरू नसल्याने प्रवाशांना त्रास

चंद्रपूर : चंद्रपूर शहरांतर्गत महामंडळाच्या वतीने सिटी बस चालविली जाते. मात्र लाॅकडाऊननंतर ती बंद करण्यात आली. तेव्हापासून अद्यापही बस सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन सिटी बस सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील सिग्नलची उंची वाढवावी

चंद्रपूर : दिवेसेंदिवस चंद्रपूर शहरातील लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल आहेत, मात्र या सिग्नलची उंची कमी असल्यामुळे एखाद्या चौकात मोठे वाहन उभे राहिल्यास मागील वाहनधारकांना सिग्नल सुरु झाले वा बंद हे दिसत नाही. त्यामुळे सिग्नलची उंची वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

सिंदेवाही : शासनातील विविध विभागामध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण मोठी वाढली आहे.

वसतिगृहातून विलगीकरण कक्ष हटवा

चंद्रपूर : विलगीकरण कक्षासाठी चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह ताब्यात घेऊन विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे लगबगीने वसतिगृह सोडावे लागले. मात्र त्यांची मूळ कागदपत्रे वसतिगृहातच लटकून आहेत. वसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्याने तिथे जाण्यास बंदी आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचण जात आहे.

Web Title: Shrubs on Pathri-Vihirgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.