झुडपी जंगलात पसरविली राख
By Admin | Updated: August 24, 2015 01:14 IST2015-08-24T01:14:39+5:302015-08-24T01:14:39+5:30
झुडपी जंगलाकरिता राखीव असलेल्या महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनीवर राख पसरविण्यात आली.

झुडपी जंगलात पसरविली राख
वरोरा: झुडपी जंगलाकरिता राखीव असलेल्या महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनीवर राख पसरविण्यात आली. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या जागृती सामाजिक संघटनेने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.
महसूल विभागाच्या ताब्यात असलेली सर्वे क्र. ४६ व ५३ ही जागा सातबाऱ्यावर झुडपी जंगल म्हणून भटाळी गावानजिक नमूद करण्यात आले आहे. असे असताना नमूद सर्व्हे नंबर सोबतच इतरही ठिकाणी शेकडो टन राख पसरविण्यात आली आहे. ही राख हवेद्वारे उडून पाण्यात मिसळत आहे. परिसरातील नागरिकांच्या घरात व शेतातील पिकांमध्ये राख पसरत असल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या राखेवर मुरुम व माती टाकण्यात आली. माती व मुरुम पाण्याने वाहून गेल्याने राख उघडी पडली आहे. ज्या परिसरात राख टाकली आहे, त्याठिकाणी दलदल निर्माण होवून मनुष्य व प्राण्यास धोका निर्माण झाला आहे. राख नजीकच्या खड्ड्यातील पाण्यात मिसळत असल्याने सदर पाणी जनावरे पिल्यास त्यांच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न पशुमालकांसमोर उभा ठाकला आहे. या राखीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ही राख भटाळी परिसरातील नागरिकांची कायमस्वरूपी डोकेदुखी ठरली आहे. याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु दखल घेण्यात आली नाही. ‘लोकमत‘मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच याची दखल जागृती सामाजिक संघटनेने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. (तालुुका प्रतिनिधी)