श्रीरामाचा गजर...

By Admin | Updated: April 16, 2016 00:35 IST2016-04-16T00:35:33+5:302016-04-16T00:35:33+5:30

रामजन्मोत्सवाच्या विलोभनीय सोहळ्याने शुक्रवारी चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले.

Shriramachar alarm ... | श्रीरामाचा गजर...

श्रीरामाचा गजर...

शोभायात्रा : रामनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले
चंद्रपूर: रामजन्मोत्सवाच्या विलोभनीय सोहळ्याने शुक्रवारी चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. रामनामाचा जयघोष करीत सायंकाळी गांधी चौकातून निघालेल्या रॅलीतील विविध देखावे पाहण्यासाठी चंद्रपुरांनी दुतर्फा तुडूंब गर्दी केली होती.
विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शहरात रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरातील विविध चौक भगव्या तोरण, पताकांनी सजले होते. मुख्य मार्गावरील चौका-चौकात डी.जे. लावण्यात आले होते. त्यावर रामनामाचा जप सुरू होता. सायंकाळी ४ वाजतानंतर शहरातील वातावरण अधिक भक्तीमय झाले. रामभक्तांचे लोंढेच्या लोंढे गांधी चौकाकडे शोभायात्रा पाहण्यासाठी जात होते. सायंकाळी ७ वाजता शोभायात्रेला गांधी चौकातून प्रारंभ झाला.
यात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. बँडपथक आणि डीजेच्या तालावर अवघ्या तरूणाईने ठेका धरला होता.
‘रामजी की निकली सवांरी’ सारखी गाणी डीजेवर वाजविली जात होती. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार या प्रमुख लोकप्रतिनिधींसह भाजपा, शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. (प्रतिनिधी)

शोभायात्रा मार्गावर खाद्यपेयाचे स्टॉल
स्थानिक गांधी चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर शिवसेना, मयात्मज सुतार समाज, आझाद बगिचा मित्र परिवार, मनसे, माहेश्वर संघटना, हिवरपुरी गणेश मंडळ, एलेवन स्टार, गवळी समाज मंडळ यासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते.
रॅलीत अवतरले स्वच्छतादूत
शोभायात्रेच्या मार्गात विविध ठिकाणी खाद्यान्न आणि शीतपेयांचे स्टॉल लागले होते. पाऊच आणि कागदी प्लेटामधून पदार्थ खाल्यावर ते रस्त्यावर फेकले जात होते. मात्र वैष्णव शिंपी समाज, पतंजली योगपिठाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा कचरा उचलला.

शोभायात्रेदरम्यान श्री काळाराम मंदिरातून श्रीरामांच्या मूर्तीची पालखी काढण्यात आली. ही पालखी जटपुरा गेट परिसरात आल्यावर राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खांद्यावर घेतली आणि श्रीरामांचा जयजयकार केला.

अन् युवकांनी ट्रॅक्टर ओढले
शोभायात्रेत वाहनांवरून विविध देखावे सादर करण्यात आले. त्यातील एक देखावा असलेले ट्रॅक्टर गांधी चौकाच्या पुढे गेल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडले. एकेरी मार्ग व त्यातच नागरिकांची दुतर्फा गर्दी लक्षात घेता सदर ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला अथवा तेथून दुसऱ्या ठिकाणी हलविणे अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन शोभायात्रेतील काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सदर ट्रॅक्टर अक्षरश: हाताने ओढत पुढे नेले. विशेष म्हणजे शोभायात्रा संपेस्तोवर हे ट्रक्टर बंद अवस्थेत सहभागी होते.

Web Title: Shriramachar alarm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.