शॉर्टकट विधीमुळे विवाहाचा चेहरा बदलला

By admin | Published: May 12, 2014 11:30 PM2014-05-12T23:30:12+5:302014-05-12T23:30:12+5:30

सध्या ग्रामीण व शहरी भागात लगीन घाई सुरु झाली आहे. महागाईच्या वाढत्या झळीमुळे बचाव करण्यासाठी झटपट विवाह ही संकल्पना मुळ धरु लागली आहे.

Shortcut ritual changed the face of the wedding | शॉर्टकट विधीमुळे विवाहाचा चेहरा बदलला

शॉर्टकट विधीमुळे विवाहाचा चेहरा बदलला

Next

विरुर (स्टे.) : सध्या ग्रामीण व शहरी भागात लगीन घाई सुरु झाली आहे. महागाईच्या वाढत्या झळीमुळे बचाव करण्यासाठी झटपट विवाह ही संकल्पना मुळ धरु लागली आहे. त्यामुळे लग्नाची दहा दिवसाची कसोटी एका दिवसात होत आहे.

पूर्वी सुमारे एक दोन महिने वधू आणि वराकडील कुटुंबाची प्रचंड धावपड, पैशाची जुळवाजुळव, निमंत्रण पत्रिका छापणे, पाहुण्यांची निमंत्रणे आदींची लगबग बघायला मिळायची. कपड्यांची खरेदी, मानपानाची व्यवस्था, अशी गडबडही असायची. आता सर्वच क्षेत्रात आलेल्या शॉर्टकटने मात्र सर्व कार्यक्रम आणि पारंपारिक चालत आलेला विवाह पद्धतीचा चेहराच बदलून टाकला. वन डे प्रोग्राममुळे लग्नाचे स्वरूपच बदलले आहे. चट मंगणी, पट ब्याहया प्रमाणे विवाह होत आहे. त्यामुळे पूर्वी लग्नामध्ये आवश्यक असलेले बोहले, मंडप आता कालबाह्य होत आहे.

ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांच्या घराची रंगरंगोटी, देवी-देवतांची चित्र काढून शुभकार्याला प्रारंभ करायचा अशी पद्धत होती. मुलीच्या घरचे लग्न असेल तर, वधू पित्याची प्रचंड धावपड असायची. दोन ते आठ दिवस हळदीचा कार्यक्रम चालायचा. नवरदेव या कार्यक्रमामुळे वैतागून जायचा. पण परंपरा पाळली जायची. नवरदेवाला हळद लावण्यासाठी खास चिखल मातीचा बोहला बनवला जायचा. एखाद्या ठिकाणी तीन बाजूने औताच खोड आणि एका बाजूने चिखलाचे गोळे लावून निमूळती घेत वरच्या बाजूला कळसाचा आकार दिला जात असे. या बोहल्याची विविधता पूजा करुनच नवरदेवाला त्यावर बसवून हळद लावली जायची. म्हणूनच एखादा लग्नासाठी घाई करत असेल तर, त्यास बोहल्यावर चढायची घाई झाली का, असे म्हटले जाते. बोहल्याचा तसेच एरंडाचा लहानसा मंडप केला जात होता. यात वर-वधूला सुवासिनी पारंपारिक गाणी म्हणून आणि उखाण्यात नावे घेऊन हळद लावण्याचा कार्यक्रम असायचा. त्यानंतर आंघोळ व पुन्हा हळद असा हा कार्यक़म असायचा. या सर्व पद्धतीमुळे वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असायचा. पाच दिवसाचे लग्न करायचे म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेचा मोठा भाग होता.

साखरपुड्याची खर्चिक प्रथा संपुष्टात येण्याची स्थिती आहे. बोहला ही पद्धत सार्वजनिक मंगल कार्यालये आणि मोठय़ा मंदिरात विवाह समारंभ सुरु झाल्यापासून बंद होत आहे. तरीही सध्या ग्रामीण भागात काही ठिकाणी बोहला उभा केल्याशिवाय लग्न होत नाही. (वार्ताहर)

Web Title: Shortcut ritual changed the face of the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.