चिमुरमधील वनडेपोत जळाऊ लाकडांचा तुटवडा
By Admin | Updated: March 23, 2017 00:37 IST2017-03-23T00:37:56+5:302017-03-23T00:37:56+5:30
येथे वनविभागाचे लाकूड साठवणूक डेपो असून नागरिकांसाठी जळाऊ लाकडे, बांबू ठेवले जाते.

चिमुरमधील वनडेपोत जळाऊ लाकडांचा तुटवडा
वनमंत्र्यांकडे तक्रार : अंत्यसंस्कारासाठीही लाकडे नाहीत
चिमूर : येथे वनविभागाचे लाकूड साठवणूक डेपो असून नागरिकांसाठी जळाऊ लाकडे, बांबू ठेवले जाते. परंतु मागील महिन्यापासून येथे लाकडं ठेवली जात नसल्यामुळे नागरिकांना फार मोठी अडचण निर्माण होत आहे.
वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. अंत्यसंस्कारासाठीही लाकडे नसणे ही शोकांतिका आहे. वनविभागाने तात्काळ दखल घेत वनडेपोत लाकडांचा साठा ठेवण्याची मागणी हिंदू क्रांतिसेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरपालिकेचे बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी केली असून संबंधित वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
चिमूर नगरपरिषद क्षेत्रात वनविभागाच्या कार्यालयात डेपो असून या डेपोत मयताच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडं, बांबू ठेवणे गरजेचे आहे. कारण हिंदू धर्मातील मय्यत व्यक्तीचे दहन केले जाते. त्यासाठी लाकडांची गरज भासते.
मात्र, वनविभागाचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मृताच्या आप्तेष्टांची मोठी गैरसोय होते. २० मार्च रोजी अंत्यसंस्कारासाठी लाकडे घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी लाकडाचा तुटवडा दिसला. यावेळी कटारे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मागील दोन महिन्यांपासून लाकडांची मागणी असताना ती पुरविली का जात नाही, उलट खडसंगीला जा असे सांगीतले जाते. चिमूर वनडेपोत लाकडे उपलब्ध करून का दिली जात नाहीत, याला कोण जबाबदार, असे प्रश्न निर्माण होत असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आ. कीर्तिकुमार भांगडिया यांच्याकडे तक्रार करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती देत डेपोत लाकडांचा साठा उपलब्ध करण्याची मागणी हिंदू क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा सभापती नितीन कटारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)