कोरोना बाधितांना जीवदान देणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 07:00 AM2020-09-26T07:00:00+5:302020-09-26T07:00:12+5:30

रेमडेसिव्हीर इंजेक्शन विषाणूजन्य आजारांवर प्रभावी ठरत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड १९ बाधित गंभीर रूग्णांसाठीही वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी एक नियमावलीही जाहीर करण्यात आली.

Shortage of life-saving injectable coronary artery disease | कोरोना बाधितांना जीवदान देणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

कोरोना बाधितांना जीवदान देणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

Next
ठळक मुद्देगंभीर रूग्णांचे कुटुंबिय चिंतातूरआरोग्य प्रशासनाने मागणी करूनही जिल्ह्याला अत्यल्प पुरवठा

राजेश मडावी
चंद्रपूर : कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाधित गंभीर रूग्णाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला. मागणीप्रमाणे अत्यल्प पुरवठा होत असल्याने या इंजेक्शनचा काळाबाजार होवू नये आणि प्रत्येक गंभीर रूग्णाला उपलब्ध करून देणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

रेमडेसिव्हीर इंजेक्शन विषाणूजन्य आजारांवर प्रभावी ठरत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड १९ बाधित गंभीर रूग्णांसाठीही वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी एक नियमावलीही जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नऊ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. सामुहिक संसगार्मुळे कोरोनाचा उद्रेक होवून रूग्णसंख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल उभारून बेड्सची संख्या वाढविलीे, ऑक्सिजन प्लॉन्ट उभारणे तसेच पायाभूत आरोग्यसुविधांचा विस्तार करण्यासाठी शथीर्चे प्रयत्न सुरू केले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची बरीच कामे पूर्ण झाली तर काही अंतिम टप्प्यात आहेत.

चंद्रपूर शहरातील वादग्रस्त खासगी हॉस्पिटल्सचा अपवाद वगळल्यास महानगर पालिकेकडूनही कोविड १९ रूग्णांसाठी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जेमतेम साठा उपलब्ध आहे. अशावेळी कोरोना बाधित गंभीर रूग्णांची संख्या वाढल्यास हे इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होणार की नाही, याची चिंता डॉक्टरांना सतावू लागली आहे. तर खासगी डॉक्टरांकडून कोरोना बाधित मात्र नॉर्मल रूग्ण या इंजेक्शनचा वापर करून घेण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.

रेमडेसिव्हीरची उपयोगिता काय?
कोरोना बाधित रूग्णाला न्यूमोनियासारखा आजार झाल्यास प्रकृतीत अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. रूग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असलेल्या रूग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे पाच डोज दिले जातात. पहिल्या दिवशी दोन आणि त्यानंतर तीन दिवस प्रत्येकी एक डोस असे हे प्रमाण आहे. या इंजेक्शनमुळे विषाणूंचा वाढता संसर्ग रोखला जावू शकतो. ताप कमी होतो. शरीरात कॉप्लीकेशन्स न वाढता रूग्ण कोरोनामुक्त होवू शकतो.

इंजेक्शन पुरवठ्याची पद्धत कशी आहे?
देशात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या सिपला, मायलॉन, हेट्रो, कॅनल, झायडस कॅडिला आदी कंपन्या आघाडीवर आहेत. कोरोनापूर्वी हे इंजेक्शन कंपन्यांच्या वितरकांकडून थेट मेडिकल स्टोअर्स व सर्व खासगी डॉक्टरांना पुरविले जात होते. कोरोनामुळे केंद्र सरकारने या पद्धतीत बदल केला. आता थेट शासकीय रूग्णालय, कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरला पुरवठा करण्याचे आदेश दिले. त्याचे दर ठरवून दिले. उत्पादक कंपन्यांना त्यानुसारच हे इंजेक्शन शासनाला प्रथम पुरवठा करणे बंधनकारकआहे. मात्र, वितरकांची साखळी तुटली. मागणी वाढून संपूर्ण राज्यात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सर्व कोरोना बाधितांना इंजेक्शनची गरज नाही
ऑक्सिजन पातळी नार्मल असणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज नाही. मात्र, गंभीर रूग्णांसाठी हे इंजेक्शन गुणकारी ठरत असल्याचा निष्कर्ष कोरोना बाधित रूग्णांच्या अभ्यासावरून पुढे आला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून शक्यतो हे इंजेक्शन गंभीर रूग्णांसाठीच कसे उपयोगी येवू शकेल, यासाठी राखून ठेवले जात आहे.

शासकीय रूग्णालयात इंजेक्शनचे २०० वायल
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून शासकीय रूग्णालयाने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या एक हजार वायलची मागणी केली होती. मात्र, इंजेक्शनचे २०० वायल उपलब्ध झाले. गंभीर रूग्णांची संख्या वाढल्यास हे इंजेक्शन प्रथम कुणाला देणार हा प्रश्न निर्माण होवू शकतो. उपचारादरम्यान इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर बाधितांच्या शरीरात गुंतागुंत निर्माण होवून मृतकांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात फक्त १० वायल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात कोविड १९ आजारावर उपचार करणाऱ्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. एक कोटी ४१लाख ५० हजार खर्चून ऑक्सिजन लिक्विड प्लॉन्ट उभारण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे फक्त १० वायल उपलब्ध आहेत. यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांना विचारणा केली असता, ह्यकाही दिवसांपूर्वी इंजेक्शनच्या २०० वायलची मागणी केली होती. शुक्रवारी सायंकाळीपर्यंत २०० वायल उपलब्ध होणार आहेत अशी माहिती दिली.

थेट रूग्णांना औषध विकण्यास प्रतिबंध
उत्पादक कंपन्यांकडून थेट ग्राहकांना हे औषध विक्री करता येत नाही. डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय रूग्णांना औषध देणे कायद्याने गुन्हा आहे. रेमडेसिव्हीर खरेदीसाठी यापूर्वी डॉक्टरांची चिठ्ठी, रूग्णालयाचे नाव, पत्ता, रूग्णांचे आधार कार्ड, रूग्णाचा भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा लागत होता. कोरोना महामारीमुळे नवे नियम लागून करून थेट औषध देण्यास प्रतिबंध आहे.

समाजमाध्यमांवर अफवांचे पीक
इंजेक्शनचे महत्त्व लक्षात आल्यानंतर समाजमाध्यमांवर उलटसुलट मेसेज व्हायरल होत आहे. विशिष्ट मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास कंपनीच्या प्रतिनिधीकडून हे औषध थेट रूग्णांपर्यंत पोहोचवून देवू असे सांगितले जात आहे. अशा मेसेजची खात्री करण्यासाठी एका क्रमांकावर चौकशी केली असता काही तास वाट पाहा असे सांगून संपर्क तोडल्याचा अनुभव चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री यांनी लोकमतला सांगितला.

ज्या कोरोना बाधित रूग्णांची ऑक्सिजन पातळी उत्तम आहे. त्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज नाही. जिथे गरज आहे तिथेच या इंजेक्शनचा वापर केला जातो. कोविड १९ वर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांकडून मागणी आल्यास याच सूचना दिल्या जात आहेत. गंभीर रूग्णांसाठी इंजेक्शन राखून ठेवण्यात आले. कमी पुरवठा असल्याने प्रशासनाने इंजेक्शनची जादा मागणी केली आहे. रूग्णांच्या कुटुंबियांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

कोट
कोरोना काळात औषध वितरक कोरोनायोद्धा म्हणून सेवा देत आहेत. प्रत्येक रूग्णाला औषध पोहोचविण्यासाठी वितरकांची जबाबदारी सर्वात मोठी आहे. मात्र, शासनाने रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरठ्यासाठी नवीन अटी तयार केल्या. कंपन्या आता थेट रूग्णालयांना पुरवठा करत आहेत. यातून वितरकांना वगळण्यात आले. त्यामुळे राज्यात रेमडेसिव्हीरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. खरे तर प्रत्येक रूग्णाला औषध मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
-मुकुंद दुबे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र केमिस्ट अ?ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, मुंबई

Web Title: Shortage of life-saving injectable coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.