ई पाॅस वर केवळ दुकानदारांचाच अंगठा, कोरोनाचा धोका कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST2021-05-08T04:29:16+5:302021-05-08T04:29:16+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊन केले आहे. गरीब कुटुंबाचे हाल ...

ई पाॅस वर केवळ दुकानदारांचाच अंगठा, कोरोनाचा धोका कमी
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊन केले आहे. गरीब कुटुंबाचे हाल होऊ नये यासाठी अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्वत: धान्य दुकानांत गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन आता शासनाने ई-पाॅसवर दुकानदारांच्याच अंगठ्यावरून लाभार्थ्यांना धान्य देण्याच्या सूचना केल्या आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येणार आहे.
मागीलवर्षी लाॅकडाऊन करण्यात आले तेव्हा अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबीयांना मोफत धान्य वितरीत करण्यात आले होते. दरम्यान, यावर्षीही लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे गरीब कुटुंबीयांना वाताहात होऊ नये यासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, स्वस्त धान्य दुकानांत लाभार्थ्यांना लाभ देताना ई-पाॅसद्वारे त्यांचा अंगठा घेतला जातो. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पासवर लाभार्थ्यांच्या अंगठ्याऐवजी दुकानदारांचाच अंगठा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे या माध्यमातून कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ लाख ३७ हजार १८७ अंत्योदय योजनेचे लाभार्थी असून २ लाख ६१ हजार ८४ प्राधान्य गटातील कुटुंब आहे. या कार्डधारकांना अन्नसुरक्षेअंतर्गत मोफत धान्य देण्यात येणार आहे तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही त्यांना मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्याने आता दुकानदारांचाच ई-पाॅसवर अंगठा घेऊन धान्य वितरीत केले जाणार आहे.
बाॅक्,
अंत्योदय लाभार्थी १,३७,१८७
प्राधान्य कुटुंब-२,६१,०८४
केशरी-५५४३१
कोटकोट
पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे ई-पास वर केवळ दुकानदारांचाच अंगठा घेण्यात येणार असून त्यानंतर लाभार्थ्यांना धान्य देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
-भारत तुंबडे
निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, चंद्रपूर
बाॅक्स
१. सॅनिटायझरचा खर्च कुणी करायचा?
रेशन दुकानांनी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना आहे. मात्र, सॅनिटायझरचा खर्च कुणी करायचा हा प्रश्न आहे. दरम्यान, स्वत:चा जीव धोक्यात घालून धान्य वितरण करणारे दुकानदारच सध्या तरी आपल्या शिखातून सॅनिटायझरचा खर्च करत आहेत.
२. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. रेशन दुकानांमध्ये सॅनिटायझर, ठेवण्यात येत असल्याची माहिती येथील दुकानदारांनी दिली.
३. स्वस्त धान्य दुकानांत धान्य घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांनी मास्क लाऊनच यावे, असे आवाहनही व्यावसायिकांसह, प्रशासनानेही केले आहे.
बाॅक्स
विमा संरक्षण देण्याची मागणी
कोरोनाच्या संकटकाळात स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य वितरणाचे काम करत आहे. अशावेळी प्रादुुर्भाव झाल्यास आणि दुदैवाने मृत्यू झाल्यास अशा दुकानदारांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.