सिंदेवाही तालुक्यात ‘पल्ल्याड’ चित्रपटाची शुटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:34+5:302021-02-05T07:37:34+5:30
लॉकडाऊनच्या प्रचंड त्रासानतंर चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या जखमेवर फुंकर मारायचे कार्य निर्माता पवन सादमवार, सुरज सादमवार आणि शैलेश दुपारे यांनी ...

सिंदेवाही तालुक्यात ‘पल्ल्याड’ चित्रपटाची शुटिंग
लॉकडाऊनच्या प्रचंड त्रासानतंर चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या जखमेवर फुंकर मारायचे कार्य निर्माता पवन सादमवार, सुरज सादमवार आणि शैलेश दुपारे यांनी केलंय. पल्याड चित्रपट हा सामाजिक विषयाला भाष्य करणाऱ्या एका परिवारात घडलेल्या काही कडू-गोड गोष्टींवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रपुरातील शैलेश दुपारे यांचे आहे तर चित्रपटाची कथा लेखक सुदर्शन खडांगळे यांनी लिहिलीय. तसेच चित्रपटातील उत्कृष्ट आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी पटकथा - संवाद लेखक- दिग्दर्शक सुदर्शन खडांगळे व दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी लिहिलीय. या चित्रपटामध्ये २५ लोकांची टेक्निकल टीम अहोरात्र काम करीत असून सगळे मिळून ८५ लोक या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात नॅशनल फिल्म अवाॅर्ड विजेते शशांक शेंडे, नाळ चित्रपटातील चैत्याच्या आईची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री देविका दफतरदार, माझ्या नवऱ्याची बायकोतील देवेंद्र दोडके, कोर्ट चित्रपटातले वीरा साथीदार, सायली देठे, गजेश कांबळे, महेश घाग आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचा नवोदित बालकलाकार रौचित निनावे याला संधी देण्यात आली आहे. चित्रपटात दोन गाणी असून चित्रपटाची गाणी अरुण सांगोळे व प्रंशात मडपुवार यांची असून संगीत जगदीश गोमिला व अश्विन तुरकर यांनी दिलंय. चित्रपटाचे आर्ट डायरेक्शन चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर स्थित शॉर्टफिल्म मेकर अनिकेत परसावर हे आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, नांदेड, नागपूर, अहमदनगर, शिर्डी या भागातील कलाकार आणि टेक्निशियन एकत्र येऊन एक दर्जेदार चित्रपट बनविणार असल्याचे दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी सांगितले.