महावितरण कंपनीचा शेकडो वीज ग्राहकांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 01:06 IST2017-07-05T01:06:57+5:302017-07-05T01:06:57+5:30
महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक विद्युत ग्राहक त्रस्त असून....

महावितरण कंपनीचा शेकडो वीज ग्राहकांना शॉक
वीज बिलाची होळी : संतप्त ग्राहकांनी दिले अधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक विद्युत ग्राहक त्रस्त असून नादुरस्त विद्युत मीटर व कमी जास्त दाबाचा विद्युत पुरवठा, चुकीचे रीडिंग अशा विविध अडचणींमुळे त्रस्त ग्राहकांनी सोमवारी वरोरा येथे महावितरण कंपनीचा निषेध नोंदवून कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
वीज वापर नसताना सुद्धा मागील दोन महिन्यांपासून मागील बिलापेक्षा २ ते १० पट वीज बील पाठविण्यात आले आहे. यात कोणतीही चूक नसताना शेकडो विद्युत ग्राहकांना भुर्दंड बसला आहे. भारनियमन नसताना सुद्धा सतत विद्युत पुरवठा खंडीत असते. १५ दिवसांपूर्वी सुनील चिचोलकर या शेतकऱ्याने पडलेले खांब हटविण्याची तक्रार देऊन सुद्धा त्यांच्या तक्रारीचे निवारण झाले नाही. त्यामुळे त्यांच्या बैलाला विद्युत झटका लागला तर शेतकऱ्याचाही अपघात झाला. अशा विविध समस्यांचे निवारण करण्याच्या मागणीकरिता सोमवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलाची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जैरुद्दिन छोटूभाई, अनिल झोटींग, रणवीर चिंचोलकर , अजय पेचे, विलास पेंदे, सुरज नागभीडकर, बाबा खंडाळकर, विनोद दर्वे, शंकर गेडाम, सुरज खंडाळकर, गुलाब तोडासे, माणिक शेंडे, रघु दडमल आदी उपस्थित होते.