ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिमुरात शिवसेनेला खिंडार
By Admin | Updated: October 25, 2016 00:39 IST2016-10-25T00:39:48+5:302016-10-25T00:39:48+5:30
राजकारणात कोण, कधी कुणाचा मित्र व शत्रू होईल सांगता येत नाही. त्यामुळे अनेक राजकीय पुढारी आपल्या हक्काचे घर शोधतात.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिमुरात शिवसेनेला खिंडार
बुरूज ढासळले : बुटले म्हणतात, अवहेलना होत होती
चिमूर : राजकारणात कोण, कधी कुणाचा मित्र व शत्रू होईल सांगता येत नाही. त्यामुळे अनेक राजकीय पुढारी आपल्या हक्काचे घर शोधतात. अनेक वर्षे शिवसेनेचा साधारण कार्यकर्ता व त्यानंतर तालुका अध्यक्षापर्यंत तळागाळात काम करुनही पक्षाकडून अवहेलना होत असल्याच्या कारणावरुन चिमूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच माजी तालुका प्रमुख व जनसामान्याचे नेते गजानन बुटले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसचा हात पकडला आहे. यामुळे चिमूर तालुक्यात शिवसेनेत मोठे खिंडार पडले आहे.
राज्यात युतीचे शासन असले तरी भाजपा व सेना एकमेकाला पाण्यात पहात आहेत. चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने अनेक वर्षे काँग्रेसचे आमदार निवडून आणले आहे. मात्र गडचिरोलीवरुन विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेचा झंजावात चिमूर विधानसभेत आला व शिवसेनेने वडेट्टीवारांच्या रुपात पहिल्यांदा आमदार दिला. मात्र काही वर्षातच वडेट्टीवारांनी शिवसेनेला धक्का देत काँग्रेस प्रवेश करुन शिवसेनेला चिमूर विधानसभा क्षेत्रात खिंडार पाडले होते.
वडेट्टीवारांच्या काँग्रेस प्रवेशानंतरही शिवसेनेची धुरा खांद्यावर घेवून एक-एक कार्यकर्ता जुळवीत चिमूर विधानसभेत व तालुक्यात शिवसेना वाढविण्याचे काम तत्कालीन तालुका प्रमुख गजानन बुटके यांनी केले. त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवित तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली तर एक वर्षापूर्वी झालेल्या चिमूर नगरपरिषदेत दोन नगरसेवक निवडून आणले होते. असे असले तरी शिवसेनेच्या अंतर्गत कलहामध्ये गजानन बुटके यांना जिल्हा नेतृत्वाकडून पदमुक्त व्हावे लागले होते.
चिमूर तालुक्यात शिवसेनेचे तीन गट अस्तित्वात आहेत. त्यात विद्यमान तालुका प्रमुख धरमसिंह वर्मा, माजी जिल्हा उपप्रमुख विलास डांगे यांचा गट व गजानन बुटके यांचा एक गट यापैकी माजी तालुका प्रमुख गजानन बुटके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रवेश केला. त्यांच्यासह उपतालुका प्रमुख सुधीर जुमडे, शहर प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पचारे यांनीही काँग्रेसचा हात पकडला आहे. या घडामोडीमुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला ऐन दिवाळीत मोठा हादरा बसला आहे.या संदर्भात गजानन बुटले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही पक्षाकडून अवहेलना होत असल्याने सेना सोडल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार परिणाम
तळागाळातील कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन बुटके यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. चिमूर तालुक्यात वडेट्टीवारांनी शिवसेना आणखी खिळखिळी केली आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर या सर्व घडामोडीचा चांगलाच परिणाम होणार आहे. सर्वच पक्षांचे या घडामोडीकडे लक्ष लागले आहे.