रिकाम्या पोटाला शिवभोजनाचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:46+5:30
जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये २२ शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात सुरू करण्यात आले आहे.

रिकाम्या पोटाला शिवभोजनाचा घास
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रामध्ये गरजू, गरीब, विमनस्क नागरिकांना भोजन मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू केली. शिवभोजन योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली. दहा रुपयाला मिळणारी शिवभोजन थाळी आता पाच रुपयाला मिळायला लागली. मंत्रीमंडळातील निर्णयाप्रमाणे शिवभोजन थाळी पुढील तीन महिने पाच रुपये या दरातच मिळणार आहे. कोरोना संसर्ग व लॉकडाऊनच्या काळात अनेक गोरगरिबांना शिवभोजनाचा घास मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये तब्बल ७९ हजार ४२४ थाळींचे वितरण झाले आहे.
जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये २२ शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, तालुकास्तरावरील पुरवठा विभागाचे कर्मचारी सर्व गरीब, गरजू नागरिकांना शिवभोजन मिळावे, यासाठी अविरत कार्य करीत आहे.
कोरोनाच्या काळामध्ये गरजू, गरीब, स्थलांतरित, कष्टकरी, विमनस्क तसेच अनेक नागरिकांच्या हाताला काम नाही, अशा नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी आधार होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व तालुका, ग्रामीण मिळून एकूण ७९ हजार ४२४ थाळी पॅक फूडद्वारे जून महिन्यात वाटप करण्यात आले आहे. या शिवभोजन थाळीमुळे गोरगरिबांना पोटाची खळगी भरताना मोठी मदत होत आहे.
स्वच्छता व सुरक्षेची विशेष काळजी
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शिवभोजन थाळी वाटप करताना शिवभोजन केंद्राद्वारे विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी होऊ न देता व सुरक्षित अंतर ठेवून भोजन हे थाळीद्वारे वाटप न करता फुड पॅकद्वारे वाटप करण्यात येत आहे. शिवभोजन केंद्रावर स्वच्छतेची, सुरक्षतेची काळजी प्रामुख्याने घेण्यात येत आहे. नागरिकांना सॅनीटायझर, हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अॅपमध्ये होते थाळीच्या प्रकाराची नोंद
पुरवठा विभागाला थाळींच्या वितरणाची दैनंदिन माहिती मिळावी यासंदर्भात लेखाजोखा ठेवण्यासाठी स्वतंत्र शिवभोजन अॅप सुरू केले आहे. या संबंधित सर्व माहिती अॅपमध्ये शिवभोजन केंद्र चालक नोंद करीत असतात. याद्वारे दैनंदिन भोजनाचा प्रकार तसेच लाभार्थ्यांचे नाव, फोटो याची नोंद घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नागरिकांना भोजनाच्या गुणवत्ते संदर्भात अभिप्रायसुद्धा या अॅपद्वारे नोंदविण्यात येत आहे.