तूर खरेदीसाठी महामार्गावर शिवसेनेचा चक्काजाम
By Admin | Updated: June 20, 2017 00:26 IST2017-06-20T00:26:45+5:302017-06-20T00:26:45+5:30
बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी करीत शिवसेनेने वरोरा येथे नागपूर-चंद्रपूर महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले.

तूर खरेदीसाठी महामार्गावर शिवसेनेचा चक्काजाम
आमदाराचे मुंडण : नागपूर-चंद्रपूर मार्ग रोखला दीड तास
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी करीत शिवसेनेने वरोरा येथे नागपूर-चंद्रपूर महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. शेतकऱ्यांना टोकन दिल्यानंतरही तूर खरेदी करण्यात आलेली नाही. त्याचा निषेध म्हणून आमदार बाळू धानोरकर यांच्यासोबत पाच शिवसैनिकांनी रस्त्यावरच मुंडण केले. तसेच बैलगाडीसह दीड तास वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे नागपूर व चंद्रपूर या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प पडली होती.
शासन निर्णयानुसार राज्यातील बाजार समित्यांमधील तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंत आपल्या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी केली परंतु शासनाने अचानकपणे तूर खरेदी बंद केली. तूर खरेदी केव्हा सुरू होणार याची माहिती शेतकरी व बाजार समित्यांना देण्यात आलेली नाही. वरोरा व भद्रावती तालुक्यातील १ हजार १२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांची हजारो क्विंटल तूर घरात पडून आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने वारंवार शासनास व सहकार पणन विभागास निवेदने दिली परंतु शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाने तूर खरेदी सुरू करावी, याकरिता आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात सोमवार नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा येथील रत्नमाला चौकात बैलबंडीस शेतकऱ्यांची चक्काजाम आंदोलन केले. चक्काजाम आंदोलनातच रस्त्यावरच आ. धानोरकर, चारगावचे शेतकरी पांडुरंग चवले, जामखुलाचे सरपंच पुरुषोत्तम पावडे, मनीष जेठाणी व सुरेश कामडी यांनी मुंडण केले. याप्रसंगी तुरीच्या घुगऱ्यांचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांनी आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारले. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार, वरोरा शिवसेना तालुकाप्रमुख विशाल बदखल, भद्रावती शिवसेना तालुका प्रमुख भास्कर ताजने, बाजार समिती उपसभापती राजु चिकटे, बाजार समिती भद्रावती सभापती वासुदेव ठाकरे, न.प. शिवसेना गटनेते गजानन मेश्राम, नगरसेवक राजु महाजन, दत्ता बोरेकर, राजू आसुकर, योगेश खामणकर, संजय घागी आदींसह व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
गनिमी काव्याने आंदोलन करणार - बाळू धानोरकर
अधिक किंमत देवून परदेशातून तूर आयात करण्यात आल्याने शासन शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत नसल्याचा आरोप आ. धानोरकर यांनी केला. शासनाने तूर खरेदी सुरू केली नाही तर गनिमी काव्याने आंदोलन करणार आहेत. तसेच तूर खरेदीची नोंदणी केली असल्याने शासनाच्या विरोधात न्यायालयातही जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.