पावरप्लॉन्टच्या प्रदूषणाविरुद्ध शिवसेनेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 01:51 IST2015-05-20T01:51:38+5:302015-05-20T01:51:38+5:30
देशात प्रदूषणात अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक प्रदूषणाने हैरान झाले आहेत.

पावरप्लॉन्टच्या प्रदूषणाविरुद्ध शिवसेनेचा एल्गार
चिमूर: देशात प्रदूषणात अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक प्रदूषणाने हैरान झाले आहेत. मात्र याच जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मागील आठ वर्षापासून सुरु असलेल्या शारदा अंबिका पावर प्लॅन्टच्या धुरामुळे व राखेच्या कणामुळे चिमूरकरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. सोबतच या प्लॅन्टसाठी वापरण्यात येणारे पाणीही चिमूरकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यातून पळविले जात आहे. त्यामुळे या पॉवर प्लॅन्टवर प्रदूषण मंडळाने कारवाई करुन प्लॅन्ट बंद करण्यासाठी चिमूर तालुका शिवसेनेने एल्गार पुकारला आहे.
मागील आठ वर्षांपासून चिमूर येथे शारदा अंबिका पॉवर प्लान्ट सुरु आहे. या पावर प्लॉन्टसाठी वापरण्यात येणारा कोंडा, कुटार व इतर जळावू साहित्याद्वारे वीज निर्मिती केली जात आहे. मात्र पॉवर प्लॉन्ट सुरु करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे चिमूर परिसरातील नागरिकांचे आरोग्य राखेच्या कणामुळे व चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे धोक्यात आले आहे. परिसरातील शेतीसुद्धा धुरामुळे धोक्यात आले आहे.
परिसरातील शेतीवर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत चिमूरला लागून असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांवरसुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे या पॉवर प्लॅॅन्ट बंद करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटले यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
पॉवरप्लॅन्ट व्यवस्थापनाकडून स्थानिक मजुराऐवजी परप्रांतीय मजुरांना रोजगार देण्यात येत आहे. मजुरांच्या पगारातून पीएफ कापला जात नाही. तसेच मजुरांना सुरक्षा साधने दिली नाही. मजुरांच्या आरोग्याची कुठलीही व्यवस्था नसून डॉक्टरांची नियुक्ती केली नाही. शेतकऱ्यांच्या टाकाऊ मालाला भाव दिल्या जात नाही. तसेच चिमूरकरांना पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर या प्लॅन्टच्या धुरांचा विपरीत परिणाम होवून चिमूरकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पॉवर प्लॅन्टमुळे चिमूरकरांच्या आरोग्यासह परिसरातील शेती धोक्यात आली आहे. तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करुन प्लॅन्टला कुलूप ठोकून बंद करण्याची मागणी आहे. पंधरा दिवसात प्लॉन्टवर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा गजानन बुटके यांनी दिला. पत्रकार परिषदेला उपशिवसेना तालुका प्रमुख सुधीर जुमडे, सचिन पचारे, उमेश हिंगे, भास्कर मांडवकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)