‘ते’ शासकीय निवासस्थान बनले ‘शेळीपालन’ केंद्र
By Admin | Updated: July 12, 2017 00:48 IST2017-07-12T00:48:37+5:302017-07-12T00:48:37+5:30
शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून कार्यक्षेत्रामध्ये सेवा देता यावी, म्हणून ग्रामीण भागात शासकीय निवासस्थाने बांधून दिली.

‘ते’ शासकीय निवासस्थान बनले ‘शेळीपालन’ केंद्र
गेवरा येथील प्रकार : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा : शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून कार्यक्षेत्रामध्ये सेवा देता यावी, म्हणून ग्रामीण भागात शासकीय निवासस्थाने बांधून दिली. चंद्रपूर वन विभागातील सावली वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या पाथरी उपक्षेत्रातील गेवरा बिटाकरिता वनरक्षकाचे गेवरा बुज येथे एक निवासस्थान बांधल्या गेले. मात्र मागील वर्षी येथील वनरक्षकाची बदली झाली. तरीसुद्धा सदर वनरक्षकाने निवसस्थान सोडले नाही. व त्याठिकाणी आपले बकरी पालण केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानाला बकरीपालन केंद्राचे रुप प्राप्त झाले आहे.
कर्तव्यात असलेल्या वनरक्षकाला स्थानिक मुख्यालयात राहून प्रशासकीय सेवा देता यावी, हा प्रमुख उद्देश पुढे ठेवून निवासस्थानाची शासकीय व्यवस्था करण्यात आली. मात्र मागील वर्षीपासून या बिटात नव्याने रूजू झालेल्या वनरक्षकाऐवजी तत्कालीन वनरक्षकाने सदर निवास्थान न सोडता, त्याच ठिकाणी आपल्या निवासस्थानासह बकरी पालन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे सेवारत वनरक्षकाला किरायच्या खोलीत राहुन वनविभागाची सेवा करावी लागत आहे. मात्र या बाबीकडे वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानाचा उपयोग खासगी बकरी पालनासाठी केला जात आहे.
गेवरा बिट वनरक्षकाकडे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्या निवासस्थानावर बकऱ्यांचे निवासस्थान दिसत असल्यामुळे शासकीय निवासस्थान बकरीपालन केंद्र असल्याचा अनुभव येत आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी व उपवनसंरक्षक चंद्रपूर यांना अनेकदा दिली. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांने अप्रत्यक्षरित्या शासकीय निवासस्थानातील बकरीपालन केंद्राला मान्यताच दिली असल्याचा संशय परिसरातील नागरिक व्यक्त करित आहेत.