पहाडावरून निघतो हातभट्टींचा धूर !शंकर चव्हाण ल्ल जिवती
By Admin | Updated: August 31, 2015 00:45 IST2015-08-31T00:45:32+5:302015-08-31T00:45:32+5:30
गाव खेड्यात शांतता नांदावी, दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे संसार सावरावे, असे अनेक उद्देश समोर ठेवून शासनाने जिल्ह्यात दारूबंदीचा महत्त्वपूर्ण दिला.

पहाडावरून निघतो हातभट्टींचा धूर !शंकर चव्हाण ल्ल जिवती
गाव खेड्यात शांतता नांदावी, दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे संसार सावरावे, असे अनेक उद्देश समोर ठेवून शासनाने जिल्ह्यात दारूबंदीचा महत्त्वपूर्ण दिला. मात्र अजूनही पहाडावरील अनेक खेड्यात हातभट्टीच्या माध्यमातून मोहफुल व गुळाची दारू मोठ्या प्रमाणात काढली जात असल्याचा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन द स्पॉट रिपोर्ट’ने उघडकीस आला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने काही ठिकाणी भेट देऊन या प्रकाराचे छायाचित्रणही केले आहे. अशा हातभट्टयातून पिणाऱ्यांना दारू रोजच मिळत असल्याने दारूबंदी झालीच कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागला आहे.
शासनाने दारूबंदी केल्यानंतर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक ठाण्यातील पोलीस सदैव सतर्क राहण्याचे आदेश दिले. काही सक्षम अधिकाऱ्यांचे पथकही नेमले. तरीही आंध्रप्रदेशातून दारू आणून विकली जाते. अति दारू पिवून अनेक दारुडे रस्त्यावर पडल्याचे आढळतात तर काही डोलत जाताना दिसतात. मग येथे दारूच मिळत नाही कसे म्हणता येईल. अवैध मार्गाने होणाऱ्या दारू विक्रीवर आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांची आहेच; त्याला सहकार्य सामाजिक संघटनांचे व नागरिकांचेही हवे. सीमावर्ती भागात पोलिसांची नाकाबंदी असतानाही दारू येते कशी? यात पोलीस आपले चांगभल तर करून घेत नाही ना, अशा अनेक विषयांवर पोलीस अधिकाऱ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने जिवती तालुक्यात या संदर्भात फेरफटका मारून दारू विक्रीची परिस्थिती जाणून घेतली असता दारूबंदी जिल्ह्यात मोहफुलाच्या हातभट्टयाच सुरू असल्याचे दिसून आले. तालुक्यातील कुंभेझरी, जिवती, उमरखेड, शेणगाव, नानकपठार, परमडोली आदी ठिकाणी अशा हातभट्टया खुलेआम सुरू असून दररोज मोहफुल व गुळाची दारू काढली जात आहे. मोहफुल व सडलेल्या गुळाची दारू काढताना ग्राहकांना जास्त नशा आणण्यासाठी त्यामध्ये युरिया खत, नवसागर, किटकनाशकाचे काही अंश व ज्वारीच्या मुळव्यासारख्या घातक रसायनाचा उपयोग केला जातो. अशी दारू नागरिकांना देऊन त्यांच्या आयुष्याशी सर्रास खेळले जात असल्याचा गंभीर प्रकार पहाडावर सुरू आहे.
अत्यंत घातक आहे मोहफुलाची दारू
मोहफुलाची दारू म्हणजे शरिरासाठी पौष्टीक व आयुर्वेदिक औषधी असल्याचा गैरसमज डोक्यात ठेवून काही लोक ही दारू आवडीने पितात. असे असले तरी त्यात विषारी पदार्थाचा वापर नशा येण्यासाठी केला जात असल्याने ही दारू आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
अशी काढली जाते दारू
मोहफुल व गुळाची दारू काढण्यासाठी तीन दिवस त्याला ड्रममध्ये सडवावे लागते. या ड्रमला सुरक्षीत जागी ठेवल्या जात नाही. त्यामुळे उंदीर, पाल व विषारी किटक नक्कीच पडतात. तीन दिवस सडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मोह व गुळ दारू काढण्यासाठी तयार होते. सर्व साहित्य व सडलेले मोहफुल किंवा गुळ ड्रममध्ये ठेवून हातभट्टी लावली जाते व काही वेळानंतर त्याचे वाफाने मिश्रण होऊन घातक अशी दारू तयार केली जाते आणि ही दारू खेड्या-पाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी वापरत असल्याचा प्रकार दारूबंदीनंतर पाहायला मिळत आहे.
दुर्घटना घडण्याचीही शक्यता
कमी पैशात अधिक नशा देणाऱ्या मोहफुलाच्या दारूकडे अनेकाचा कल वाढला असला तरी या विषारी दारूमुळे एखाद्यावेळी जिवितहानी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.