शकीलच्या घरी वाहतेयं दुधाची गंगा
By Admin | Updated: August 12, 2016 01:18 IST2016-08-12T01:18:32+5:302016-08-12T01:18:32+5:30
घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. पण आता तोच त्याचा व्यवसाय झाला आहे.

शकीलच्या घरी वाहतेयं दुधाची गंगा
बेरोजगारीवर मात : शेतकऱ्यांसाठीही एक आदर्श
घनश्याम नवघडे नागभीड
घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. पण आता तोच त्याचा व्यवसाय झाला आहे. आता एक नाही तर तब्बल ४५ म्हशी, सात गायी, २५ बकऱ्या त्यांच्या घरी असून तो आता नागभीड तालुक्यातील एक प्रमुख दुध उत्पादक म्हणून गणला जात आहे. शेतीला पुरक जोडधंदा करणाऱ्यांसाठी त्याने एक आदर्श निर्माण केला आहे.
शकील शौकत शेख असे या दुध उत्पादकाचे नाव असून तो नागभीड येथील रहिवासी आहे. घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. ती गाय दररोज आठ लीटर दूध द्यायची. घरी एवढ्या दुधाची गरज नाही म्हणून तो उर्वरीत दुध विकू लागला. त्यातून घरखर्च निघू लागला. त्याने विचार केला आपण हाच व्यवसाय केला तर? त्याने मनाशी ठाणले. आणि एक एक म्हैस, गाय ता ेविकत घेवू लागला.
या सहा वर्षात शकीलने अनेक गायी, म्हशी विकत घेतल्या. शकीलकडे आज ४५ मुर्श, कोचर जातीच्या म्हशी, होस्टन, जर्सी जातीच्या सात गायी आणि अजमेरी, जमनापरी जातीच्या २५ बकऱ्या आहेत. या गायी-म्हशी पासून शकील रोज २७० ते २८० लीटर दुधाचे उत्पादन करतो. उत्पादीत झालेले दुध तो येथील सर्व मोठ्या हॉटेल्सना पुरवितो. दुधात गुणवत्ता असल्याने त्याने उत्पादीत केलेल्या दुधाला ४० ते ५० रुपये लीटर भावही मिळत आहे.
या गायी म्हशीच्या देखभालीसाठी त्याने नियमित सात व्यक्ती ठेवल्या आहेत आणि प्रत्येकाला कामही नेमून दिले आहे. साधारण आपल्या भागातील दुध उत्पादक वैरणासाठी तणसाचा वापर करतात. पण शकील तणसाचा वापर फार कमी प्रमाणात करतो. तो कुटार आणि गव्हाडा वापरतो. या व्यवसायातून शकीलने चांगलीच आर्थिक प्रगती साधली आहे. मजूर खाद्य आणि औषधी यांचा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्याला लाख रुपयाचा फायदा होत आहे.
शकीलला आता पशुधनाचा बराच अभ्यास झाला आहे. या पशुधनावर हलके-फुलके आजार उद्भवल्यास तो स्वत:च त्यांच्यावर उपचार करतो. मात्र गंभीर आजार दिसून आल्यास येथील डॉक्टरांकडे घेवून जातो. खरे तर दुध उत्पादनासाठी नागभीड तालुका संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. पण ही ओळख हळूहळू कमी होत आहे. नैसर्गिक पार्श्वभूमी उपलब्ध असूनही केवळ निरुरस्साहामुळे या तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस कमी होत आहे. शकीलचा आदर्श समोर ठेवून या तालुक्यातील तरुणांची पशुधनास व्यवसाय म्हणून स्विकारले तर बेरोजगारीवर मात करता येईल.