सावलीचा पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर
By Admin | Updated: January 29, 2015 23:04 IST2015-01-29T23:04:04+5:302015-01-29T23:04:04+5:30
सावली पंचायतीतील पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात १४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. मात्र १० वर्षांपासून येथे पशुधन विकास अधिकारीच नसल्याने तालुक्यात असलेल्या पशुवैद्यकीय

सावलीचा पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर
उपरी : सावली पंचायतीतील पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात १४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. मात्र १० वर्षांपासून येथे पशुधन विकास अधिकारीच नसल्याने तालुक्यात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी पशुपालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सावली पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील उपरी येथे श्रेणी-१, बोथली येथे श्रेणी-१, पशुवैद्यकीय दवाखाने असून येथे पशुधन विकास अधिकारी पद मंजूर असून उपरी येथील आठ वर्षांपासून तर बोथली येथील तीन वर्षांपासून पद रिक्त आहे. तालुक्यातील श्रेणी-२ मध्ये सावली, लोंढोली, सामदा, निमगाव, विहीरगाव, व्याहाड (बुज), पाथरी, निफंद्रा, पालेबारसा, जिबगाव, चिचबोडी, केरोडा येथील पशुवैद्यकीय दवाखाने येतात. यामधील अनेक दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी वर्गाकडून पशुंना उपचार मिळत नसल्याची माहिती आहे. हे अधिकारी गावात अचानक येत असल्याने अनेक पशुपालक त्यांना हे गुरांचे डॉक्टर म्हणून ओळखतही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुपालकाशी संपर्क नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही गावे जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी ग्रामपंचायतीचा ठराव घेवून जोडली आहेत.
सावली पंचायत समितीतील पशु संवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. पं.स. अंतर्गत येणाऱ्या पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुणाचीही देखरेख व नियंत्रण नसल्याने रामभरोसे कारभार सुरू आहे.
मागील दहा वर्षापासून सावली पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार मूल पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी अतिरिक्त कार्यभार म्हणून सांभाळत आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळताना सावली पंचायत समितीमधील १४ पशू वैद्यकिय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवताना सदर अधिकाऱ्याची कसरत होत आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाकडून मिळणाऱ्या लाभापासून पशुपालकांना वंचित रहावे लागत आहे. अनेकदा महत्वाची माहितीदेखील मिळत नाही. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाने सावली पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पद तातडीने भरून पशुपालकांसाठी चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी, यासाठी लोक प्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)