सांडपाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:48+5:302021-01-09T04:23:48+5:30
विहिरींचे अनुदान देण्याची मागणी ब्रह्मपुरी : धडक सिंचन विहिर योजनेतून खोदकाम झाले. परंतु, निधी न मिळाल्याने कामे थंडाबस्त्यात आहेत. ...

सांडपाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
विहिरींचे अनुदान देण्याची मागणी
ब्रह्मपुरी : धडक सिंचन विहिर योजनेतून खोदकाम झाले. परंतु, निधी न मिळाल्याने कामे थंडाबस्त्यात आहेत. मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळाले नाही. अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. निधी मिळाली असती तर रब्बी हंगामापूर्वीच कामे पूर्ण झाली असती.
कोरपनातील बसफेऱ्या वाढवाव्यात
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी ६ वाजतानंतर बसफेरी नाही. आता कोरोनाचे रूग्ण कमी झाली आहेत. वणी या परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. गावातील नागरिकांना हीच शेवटची बस आहे. बस नसल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याची मागणी
घुग्घुस : परिसरातील अनेक गावांमधील काही वार्डांमध्ये विद्युत पुरवठा झाला नाही. या वार्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेत्ांर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा
गडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरू असते. गतिरोधक नसल्याने येथे अपघात घडत आहेत. या महामार्गावरील राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबुराव शेडमाके चौक गतिरोधक नाही.
स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढवावा
पोंभुर्णा : गाव, शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजुनही यश आले नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणारे अनेकजण आढळतात. त्यामुळे स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
बसस्थानकाची स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : येथील बसस्थानक समोरील परिसरात कचरापेटी नसल्यामुळे उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. या मार्गावर नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे याठिकाणी कचराकुंडी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गाईचा मृत्यू झाला होता. तसेच जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अवैध वाहतुकीला आळा घाला
भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
वर्दळीच्या मार्गावर वाहनांचे पार्किंग
ब्रह्मपुरी : शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जात आहे. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण, ही कारवाई लगेच थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.