ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई
By Admin | Updated: May 18, 2015 01:19 IST2015-05-18T01:19:52+5:302015-05-18T01:19:52+5:30
तालुक्याच्या भागात एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई
ब्रह्मपुरी : तालुक्याच्या भागात एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथे स्वतंत्र पाण्याची सोय नसल्याने संपूर्ण दवाखान्याची भिस्त नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. परिणामी रुग्णांना व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन काही रुग्ण भरती असतात. त्यांच्यासोबत किमान एक व्यक्ती असते. जवळपास रुग्णांना व सोबतच्या व्यक्तीला लागणारे पाणी पुरविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी पुरवठ्यासाठी ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र अशी सोय नाही. दवाखान्याच्या परिसरात एक बोअरवेल आहे. परंतु तीसुद्धा नादुरुस्त आहे. त्यामुळे दवाखान्यातील रुग्णांना तसेच तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात नळाचे पाणी मुबलक येत नसल्याने मागील एक दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट असल्याने रुग्णांची व त्याच्याजवळ राहणाऱ्या व्यक्तीची तारांबळ उडत आहे. १०० खाटांचे रुग्णालय करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जात आहे. परंतु पाण्याच्या स्वतंत्र सोईकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. नादुरुस्त बोअरवेल दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही ती दुरुस्त केली जात नसल्याने कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.
रुग्णालयासारख्या महत्वाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथे स्वतंत्र पाण्याची सोय करून देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे. (प्रतिनिधी)