मूल नगर परिषदेतील मालमत्ता विभागात सावळा गोंधळ

By Admin | Updated: November 1, 2015 01:09 IST2015-11-01T01:09:41+5:302015-11-01T01:09:41+5:30

स्थानिक नगर परिषदेमधील मालमत्ता विभागात कार्यरत विभाग प्रमुख बोस यांच्या दुर्लक्षितपणामुळे सावळा गोंधळ सुरू असून ...

Severe confusion in the property department of the parent city council | मूल नगर परिषदेतील मालमत्ता विभागात सावळा गोंधळ

मूल नगर परिषदेतील मालमत्ता विभागात सावळा गोंधळ

विभाग प्रमुखाचा दुर्लक्षितपणा : फेरफार नोंदीची प्रकरणे धूळ खात
मूल : स्थानिक नगर परिषदेमधील मालमत्ता विभागात कार्यरत विभाग प्रमुख बोस यांच्या दुर्लक्षितपणामुळे सावळा गोंधळ सुरू असून गृहकर भरण्यास आलेल्या नागरिकांना ताटकळत तासन्तास वाट बघावी लागते. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून फेरफार नोंदीचे प्रकरण धूळखात असून नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही फेरफार केला जात नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याकडे न.प. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नगर परिषदेत उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता विभाग आहे. मात्र मालमत्ता विभागात कार्यरत असलेले विभाग प्रमुख बोस हे चंद्रपूरवरुन ये-जा करीत असल्याने वेळेवर कार्यालयात केव्हाच उपलब्ध राहात नाहीत. संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणे, त्यातील नियोजन करणे, ही विभाग प्रमुखांची जबाबदारी असताना मात्र त्याकडे त्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गृहकर भरण्यास आलेल्या नागरिकांना ताटकळत वाट बघावी लागत असेल तर नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता विभाग संवेदनशिल नसल्याचे यावरुन दिसून येते. मालमत्ता विभागातील कर्मचारी जनगणनेच्या कामात असले तरी कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना गृहकराची पावती कापण्यासाठी एका कर्मचाऱ्याला तरी कार्यालयात बसवून जबाबदारी देणे गरजेचे होते. मात्र विभाग प्रमुखाच्या दुर्लक्षितपणामुळे मालमत्ता विभागातील प्रशासन ढासळल्याची बाब समोर आली आहे.
नगर परिषदेच्या क्षेत्रात प्लॉटची विक्री केल्यानंतर रितसर नोंदीसाठी नगरपरिषदेकडे आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर केल्या जातो. त्याची वर्तमान पत्रात रितसर जाहीरात दिली जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच त्याची फेरफार नोंद करणे आवश्यक असताना नागरिकांना हेलपाट्या माराव्या लागत आहे. तब्बल सहा महिन्यानंतरही फेरफार नोंद करण्यात आली नसल्याने नागरिकांचा नगर परिषदेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. कुणाला बांधकामासाठी परवानगी घ्यायची असल्याने फेरफार नोंदीची आवश्यकता असते. मात्र यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. ‘चिरीमिरी’ घेण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नोंदी नसल्याने बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर करता येत नाही. ज्यांना कुणाला बांधकाम करायचे आहे, त्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली तर अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात येते. एकीकडे फेरफार नोंद घ्यायची नाही दुसरीकडे बांधकाम सुरू केल्यास नोटीस द्यायची ही बाब न संताप आणणारी आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

नागरिकांची होत आहे गोची
मूल नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने नागरिकांची चांगलीच गोची होत आहे. विभाग प्रमुख आपल्या कर्तव्यापासून दूर जात असल्याने त्याच्या अख्त्यारित काम करणारे कर्मचारी अनियंत्रित झाले आहेत. अच्छे दिन आणून म्हणणाऱ्या भाजपाचीच या नगरपालिकेवर सत्ता आहे. मात्र सत्ताधारीही याकडे कानाडोळा करताना दिसतात. भाजपाप्रणित नगर परिषद प्रशासनातील पारदर्शकता आणण्यास सत्तारुढ पदाधिकारी व नगरसेवक प्रयत्न करणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Web Title: Severe confusion in the property department of the parent city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.