लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली, तरी सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही सातवा टप्पा रखडला आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अंतिम टप्प्यात विशेषतः अवघड व दुर्गम भागातील रिक्त पदे भरण्याचा उद्देश होता. मात्र, प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) चे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने शासनाकडे तत्काळ बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हिन्सीस आयटी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात येत आहेत. संवर्ग १, २, ३, ४ तसेच विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर २१ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. २२ ऑगस्टला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे माहिती मागवण्यात आली होती आणि २७ऑगस्टपर्यंत ती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट संपला तरीही पुढील टप्पा सुरू न झाल्याने शिक्षकांमध्ये निराशा आणि संताप निर्माण झाला आहे. बदल्या न झाल्याने शिक्षकांचे नियोजन अडकले आहे.
बदल्या रखडल्याने रिक्त पदांचा अनुशेष सतत वाढत आहे. अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत असून, विद्यार्थ्यांवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री कार्ययोजनेंतर्गत रिक्त पदे तातडीने भरावी, अशीही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच, रखडलेल्या बदल्या त्वरित करण्याची मागणी संघटनेद्वारे करण्यात आली.प्रकाश चुनारकर, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग).