सात हजार सुशिक्षितांना नोकरी
By Admin | Updated: November 25, 2014 22:52 IST2014-11-25T22:52:03+5:302014-11-25T22:52:03+5:30
उच्च शिक्षण घेऊन दरवर्षी शेकडो सुशिक्षीत युवकांचे जत्थे बाहेर पडत आहेत. मात्र, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. रोजगारासाठी साऱ्यांचीच धडपड सुरु आहे.

सात हजार सुशिक्षितांना नोकरी
नोंदणी पटात घट : रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणीचा फायदा
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
उच्च शिक्षण घेऊन दरवर्षी शेकडो सुशिक्षीत युवकांचे जत्थे बाहेर पडत आहेत. मात्र, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. रोजगारासाठी साऱ्यांचीच धडपड सुरु आहे. मात्र, रोजगार व स्वंयरोजगार केंद्राने गत पाच वर्षात ६ हजार ९३६ सुशिक्षीतांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकरी मिळवून दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात सुशिक्षीतांची नोंदणी होत असते. यात दरवर्षी नोंदणी व नुतणीकरण होत असल्याने सुशिक्षीतांची शैक्षणिक पात्रता रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात उपलब्ध असते. २००८ पासून आॅक्टोंबर २०१४ पर्यंत चंद्रपूरच्या जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात ५ लाख ४७ हजार ३४८ सुशिक्षीत बेरोजगारांनी नोंदणी केली. यापैकी ८३ हजार ४४० उमेदवारांचे नोकरी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. यात ६ हजार ९३६ उमेदवारांना विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय व खाजगी कार्यालय, कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे.
रोजगार व स्वंयरोजगार केंद्रामार्फत सुशिक्षीतांची नोेंदणी करुन त्यांची शैक्षणिक पात्रता अपडेट ठेवली जात असल्याने एखाद्या शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकर भरती निघाल्यास घरपोच पत्र पाठवून नोकरीसाठी बोलाविले जाते. याचा लाभ शेकडो उमेदवारांना झाला आहे. असे असले तरी अनेक जण एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा नुतणीकरणासाठी येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे केंद्रात उपलब्ध आकडेवारीत अनेक जण बेरोजगारच असल्याचे दिसून येते. सध्या सुशिक्षीत बेरोजगारांमध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती झाली आहे. त्यामुळे अनेकजण स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातूनही नोकरी मिळत आहे.