चंद्रपुरात कारवाईसाठी सात पथके सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:45+5:302021-03-18T04:27:45+5:30
चंद्रपूर : शहरात बेफिकीर वृत्ती वाढत असल्याचे पाहून मनपा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. नियमांचे ...

चंद्रपुरात कारवाईसाठी सात पथके सज्ज
चंद्रपूर : शहरात बेफिकीर वृत्ती वाढत असल्याचे पाहून मनपा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. नियमांचे पालन न करणारे सभागृह, लॉन, हॉटेल्स मालक, दुकाने, चहा टपरी, नाश्ता ठेले व अन्य दुकानांवर दंड व सील ठोकण्याची कारवाई गुरुवारपासून केली जाणार आहे.
शहरात विविध ठिकाणी नाश्ता पॉइंटवर मोठी गर्दी होत आहे. भाजी विक्रेते व विविध दुकानदारांकडून मास्क न घालणे व अंतर न पाळण्याची बेफिकीर वृत्ती वाढीस लागली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी मनपाने सात पथके गठित केली. सार्वजनिक ठिकाणी, परिसरात मास्क वापरावे व अंतर पाळावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने नवीन सूचना जारी करताच कठोर पालन करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी बुधवारी बैठकीत दिले. या वेळी उपायुक्त अशोक गरोटे, विशाल वाघ, साहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, संतोष कंदेवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयु गावंडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ.चंद्रागडे, नरेंद्र जनबंधु व सर्व स्वच्छता निरीक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार
चंद्रपुरात कोरोना टेस्टिंग वाढावे, प्रतिबंधित झोनची गरज पडल्यास पोलीस विभागाच्या साहाय्याने तयारी ठेवावी. गृह विलगीकरणातील व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यासोबतच लसीकरण मोहिमेची गती वाढविण्याचेही निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.