सात लाखांचा रस्ता सात दिवसात उखडला
By Admin | Updated: April 1, 2015 01:19 IST2015-04-01T01:19:17+5:302015-04-01T01:19:17+5:30
जिल्हा परिषद विभागाच्या बेबंदशाही कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिलाची उचल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सात लाखांचा रस्ता सात दिवसात उखडला
जिवती : जिल्हा परिषद विभागाच्या बेबंदशाही कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिलाची उचल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील आसापूर-पेदाआसापूर येथील घाटावर सात लाख रुपये खर्च करून रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र खडीकरणाचा रस्ता सातच दिवसात उखडला असून जिल्हा परिषद विभाग रस्त्याच्या कामाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
पेदाआसापूर गावातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रस्ता सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा परिषद विभागाकडून अनेक दिवसांच्या मागणीनंतर ६०० मीटर कामासाठी सात लाखाचा निधी मंजूर केला होता. मात्र संबंधीत कंत्राटदाराने आपली पोळी शेकून घेण्यासाठी थातुरमातूर कामे केल्याने अल्पावधीत रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या आहेत. अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात समस्यांच गुंता कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज एक ना एक नव्या समस्येत भर पडत आहे. तालुक्यातील गावे तालुक्याशी जोडली जावी यासाठी कुठे सार्वजनिक विभागाची कामे तर कुठे जिल्हा परिषद विभागाची कामे सुरू आहेत. मात्र त्या कामावर नियंत्रण ठेवून काम चंगले करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारासोबत आपले चांगभलं करून रस्त्याची वाट लावली जात आहे. आधीच या परिसरात विकासात्मक कामे लवकर मंजूर होत नाही. अनेक दिवसांच्या मागणीनंतर काम कसे तरी मंजूर होतात.
मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढून कंत्राटदार मोकळे होतात. हा सगळा प्रकार त्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना माहीत असतो, तरी पण कामाची बिले काढतात कसे, कामाची गुणवत्ता तपासली का जात नाही, तपासली जात असेल तर उखडलेला रस्ता परत दुरुस्त करून घेणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)